
Milk Rate : दूधाला हमीभाव व अनुदान द्यावे; पुणे जिल्हा दूध संघाची राज्य आणि केंद्र सरकारकडे मागणी
कात्रज - दुग्धव्यवसाय हा ग्रामीण अर्थकारणासाठी महत्त्वाचा घटक आहे. तथापि दूधास योग्य भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असून दूध उत्पादक शेतकऱ्यांस दूधाचा उत्पादन खर्च देखील सुटत नाही.
त्यामुळे ग्रामिण भागातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून सतत होणाऱ्या तोट्यामुळे दुध व्यवसाय बंद करण्याच्या मनस्थितीत दूध व्यावसायिक असतात. त्यामुळे दूध उत्पादक शेतकन्यांना योग्य दर मिळण्यासाठी दूधाला हमीभाव व अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य आणि केंद्र सरकारकडे पुणे जिल्हा दूध संघाने केली आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दूध पावडरचे दर कमी झाल्याने दूध पावडर करणान्या व्यावसायिकांनी दूध खरेदी कमी केली आहे. त्याचा परिणाम म्हणून बाजारपेठेतील दूध खरेदीचे दर कमी होत आहेत. यासाठी ज्याप्रमाणे ऊसाचा दर एफआरपीवर दिला जातो.
त्याप्रमाणे दूधास हमी भाव दर मिळावा, त्याअनुषंगाने योग्य असे धोरण ठरवून दूध उत्पादक शेतकऱ्यांस न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार यांनी केंद्रिय दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रूपाला, राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दूधास प्रतिलिटर किमान ३५ रुपये हमीभाव मिळावा त्याचप्रमाणे दूध उत्पादक शेतकन्यांस कायमस्वरुपी प्रतिलिटर ५ रुपये शासकीय अनुदान मिळावे, जेणेकरुन दूध उत्पादकास प्रति लिटर ४० रुपये खरेदी दर मिळेल व त्याला खर्च भागवणे सुकर होईल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.