पुणे : राजस सोसायटी चौकातील कलवट व सिमाभिंतीची दुर्दशा

अशोक गव्हाणे 
Saturday, 5 December 2020

राजस सोसायटीत जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या ओढ्याच्या तटरक्षक भिंती पडल्या असून त्या ठिकाणी नागरिक कचरा टाकत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाचाही याकडे कानाडोळा होत असून पडलेल्या भिंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्यावरून राजस सोसायटी चौकालगत असणाऱ्या कलवटाची आणि सीमाभिंतीची दुर्दशा झाली आहे. त्याचबरोबर प्रभाग क्र. ३८ ड मधील नानासाहेब पेशवे तलावातून व कात्रज गुजरवाडी डोंगरातून आंबिल ओढा वाहत आहे. या ओढ्यातून सांडपाणी वाहून नेण्यासाठी असलेला कलवट अरुंद असून सांडपाणी कलवटमध्ये बसत नाही. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी येत असल्याने नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर  खबरदारी घेऊन कलवटाची रुंदी व उंची वाढविण्याची मागणी प्रगती फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे.

हे ही वाचा : मानधनासाठी संघर्ष ः सीईओंच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे

राजस सोसायटीत जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या ओढ्याच्या तटरक्षक भिंती पडल्या असून त्या ठिकाणी नागरिक कचरा टाकत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाचाही याकडे कानाडोळा होत असून पडलेल्या भिंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. २५ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या अतिवृष्टीत फार मोठे नुकसान झाले होते. ही कामे यावर्षीच्या पावसाळ्यापूर्वीच होणे गरजेचे होते. पण पावसाळा होऊनही याची कोणीही गांभिर्याने दखल घेतलेली नाही. आतापासून मंजुरी ते निविदा आणि त्यानंतर काम अशा एकूण कामासाठी बराच कालावधी लागणार असल्याने आतापासून सुरुवात झाल्यास किमान पुढील पावसाळ्यात नागरिकांचे हाल होणार नाहीत.

हे ही वाचा : दिव्यांग व दृष्टिहिनासाठी महाविद्यालय उभ्या करणाऱ्या संस्थापिका जाई खामकर यांनी केलेले काम गौरवास्पद

गेल्या सात आठ महिन्यांपासून सातत्याने नाल्याच्या पडलेल्या सिमाभिंतीबाबत आणि कलवट रुंद करण्याबाबत सातत्याने संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांशी व प्रत्यक्ष भेटून सदर कामासंदर्भात वारंवार पाठपुरावा करीत आहोत. परंतु, अद्याप सिमाभिंती बांधण्याचे काम सुरु झालेले नाही. 
- प्रतिक कदम, प्रगती फाऊंडेशन

कलवट रुंदीकरणाच्या कामासाठी मान्यता मिळाली असून पथविभागामार्फत त्याचे काम करुन घेण्यात येणार आहे. यामध्ये कलवट पाडून नव्याने बांधून त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. लवकरच कामाच्या निविदा काढण्यात येणार आहेत. 
 - जगदीश खानोरे, अधिक्षक अभियंता, महापालिका विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Katraj Kondhwa Road near Rajas Society Chowk is in a state of disrepair