जबाबदारी मोठी, हायकमांडचे आभार

जबाबदारी मोठी, हायकमांडचे आभार
Published on

कोची, ता.१४ (वृत्तसंस्था) ः केरळमचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी गुरुवारी पक्षाच्या हायकमांडने त्यांच्यावर सोपविलेल्या मोठ्या जबाबदारीबद्दल आभार मानले आहेत. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. केरळममधील जनतेने आमच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. ‘‘डाव्या आघाडीची दहा वर्षांची सत्ता संपुष्टात आणून १४० पैकी १०२ जागांवर विजय मिळवून देत जनतेने आम्हाला कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही दिलेली आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण करू,’’ असे सतीशन म्हणाले. ‘‘केरळममध्ये ‘नवे युग’ सुरू करण्यासाठी आणि राज्याचा कायापालट करण्यासाठी आम्ही निष्ठेने काम करू. राजकीय आणि सार्वजनिक कार्याची व्याख्या आम्ही बदलून टाकू,’’ असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सतीशन यांनी राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांचे आभार मानले. ‘‘वेणुगोपाल यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधला आणि पक्षाच्या सर्व उपक्रमांना पाठबळ दिले, ज्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाला,’’ असे ते म्हणाले. निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे चेन्नीथला यांचा उल्लेख त्यांनी ‘माझे नेते’ असा केला. वेणुगोपाल आणि चेन्नीथला हे दोघेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते मात्र भविष्यात या दोघांनाही विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे सतीशन यांनी सांगितले.

कोट
मुख्यमंत्रिपद ही वैयक्तिक उपलब्धी नसून ती एक ‘दैवी देणगी’ आहे. केरळमच्या विकासासाठी सर्व समाजघटकांनी आणि विरोधकांनी एकत्र यायला हवे. मंत्रिमंडळाचा निर्णय पक्ष घेईल आणि त्यात माझे व इतर नेत्यांचे मत विचारात घेतले जाईल.
- व्ही.डी. सतीशन, काँग्रेसचे नेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com