कामगार पळाले गावाला; पुण्यात महामेट्रोचं चाक रुतलं!

Pune_Metro_Construction
Pune_Metro_Construction

पुणे : कोरोनामुळे मजुरांचा तुटवडा भासू लागल्यामुळे महामेट्रोने उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि मध्य प्रदेश येथील प्रशासनाला साकडे घातले आहे. तेथून परतण्यास इच्छूक असलेल्या मजुरांना पुण्यात येण्यासाठी तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी महामेट्रोने केली आहे. मजुरांअभावी महामेट्रोचे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील काम सुमारे 25 टक्के क्षमतेनेच सध्या सुरू आहे. 

स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज ते रामवाडी मार्गावर महामेट्रोचे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काम सुरू आहे. त्यावर या पूर्वी सुमारे 2600 मजूर काम करीत होते. लॉकडाउन सुरू झाल्यावर महामेट्रोने मजुरांचा सांभाळ केला होता. परंतु, 8 मे पासून श्रमिक स्पेशल ट्रेन आणि मजुरांसाठी बस सुरू झाल्यावर टप्प्याटप्प्याने सुमारे 1800 मजूर आपआपल्या गावांकडे परतले आहेत. त्यामुळे सध्या सुामरे 800 कामगारांवरच मेट्रोचे काम सुरू आहे. 

दोन्ही शहरांत महामेट्रोचे सुमारे 16 लेबर कॅंप आहेत. तेथे हे 800 मजूर राहत आहेत. त्यांना अन्न-धान्य महामेट्रोकडून पुरविले जाते. तसेच मास्क, सॅनिटायझर आदी वैद्यकीय सुविधाही पुरविल्या जात आहेत. येरवडा येथील लॅबर कॅंपमध्ये असणाऱ्या 70 मजुरांपैकी गेल्या आठ दिवसांत सुमारे 20 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यातील 5 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. उर्वरित रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. पन्नास मजुरांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, असेही महामेट्रोने स्पष्ट केले. 

मेट्रोसाठी पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी, फुगेवाडी तर, पुण्यात नगर रस्ता, कर्वे रस्ता, मुठा नदीचे पात्र, रेंजहिल्स आणि कोथरूड डेपो आदी ठिकाणी कामे सुरू आहेत. मात्र, मजुरांच्या तुटवड्यामुळे तेथे सध्या सुमारे 25 टक्के क्षमतेनेच काम सुरू आहे. तसेच भुयारी मेट्रोसाठी या पूर्वी रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यान 24 तास काम सुरू होते. आता हे काम 12 तास सुरू आहे. मजुरांचा तुटवडा दूर करण्यासाठी महामेट्रोतर्फे विविध राज्यांत प्रयत्न सुरू आहेत. त्याला अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. बिहारमधूनही पाच अभियंते शहरात नुकतेच परतले आहेत. 

मजुरांचा तुटवडा दूर करण्यासाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमध्ये प्रशासनाशी संपर्क साधला आहे. पुण्यात मेट्रोच्या कामासाठी येऊ इच्छिणाऱ्या मजुरांना तातडीने परवानगी द्यावी, अशी विनंती प्रशासनाला एका पत्राद्वारे करण्यात आली आहे. 
- हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक महामेट्रो 

लॉकडाउनचा परिणाम
- महामेट्रोच्या मजुरांची संख्या 2600 वरुन 800 
- प्रकल्पाचे काम 25 टक्के क्षमतेने 
- 'भुयारी'साठी 24 तासांऐवजी 12 तास काम

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com