'कम्युनिटी ट्रान्समिशन'बाबत आरोग्य मंत्रालयाने काय केलाय दावा? वाचा सविस्तर

वृत्तसंस्था
Thursday, 11 June 2020

दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांचा कॉन्टॅक्ट ट्रेस होऊ न शकल्यामुळे, दिल्लीत कोरोनाचा समूह संसर्ग सुरु झाला असल्याचे म्हटले जात होते.​

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या समूह संसर्ग (कम्युनिटी ट्रान्समिशन)ला अजून सुरवात झाली नसल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी (ता.११) दिली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे ठीक होण्याचे प्रमाण देखील वाढले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढू लागल्याने देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु झाला असल्याचे म्हटले जात होते. यावर देशातील लोकसंख्येनुसार एक टक्क्याहून कमी लोकांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने, देशात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव यांनी म्हटले आहे. 

- केंद्राने हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवरील बंदी उठविली

मागील काही दिवसांपासून देशभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र फक्त याच गोष्टीमुळे देशात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असल्याचे वृत्त आयसीएमआरचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव यांनी फेटाळून लावले आहे. यासंदर्भात बोलताना बलराम भार्गव यांनी, देशाच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्क्याहून कमी म्हणजे ०.७३७३ टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे सांगितले.

- जगप्रसिद्ध लोणार झालाय गुलाबी; हे आहे त्यामागचे कारण...

तसेच शहरी भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे ठीक होण्याचे प्रमाण देखील ४९.२१ टक्के इतके वाढले असून, देशातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर हा जगातील इतर देशांपेक्षा सर्वात कमी असल्याचे बलराम भार्गव यांनी सांगितले. संपूर्ण देशातील एकूण ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोना विषयक पडताळणी केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आल्याचे बलराम भार्गव यांनी म्हटले आहे.      

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात वेळेवर टाळेबंदी करण्यात आल्याने, कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार मोठ्या प्रमाणात कमी झाला असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र अजूनही धोका टळला नसल्याचे त्यांनी नमूद केले. याव्यतिरिक्त प्रतिबंधित क्षेत्रात याची परिस्थिती अजूनही संवेदनशील असल्याने टाळेबंदी चालू ठेवणे आवश्यक असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.            

- पाकिस्तानचा सर्वात मोठा कट उधळला...

दरम्यान, दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांचा कॉन्टॅक्ट ट्रेस होऊ न शकल्यामुळे, दिल्लीत कोरोनाचा समूह संसर्ग सुरु झाला असल्याचे म्हटले जात होते. सध्या देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २ लाख ८६ हजार ५७९ इतकी झाली आहे. यामध्ये १ लाख ३७ हजार ४४८ रुग्णांवर उपचार सुरु असून, १ लाख ४१ हजार २९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ८ हजार १०२ जणांचा कोरोनामुळे देशात मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Government declared that India Definitely Not In Community Transmission