'यहाँ के हम सिकंदर'; सलग चौथ्या वर्षी पुणे विद्यापीठ देशातील 'टॉप-10' विद्यापीठांच्या यादीत!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

- यंदा पुणे विद्यापीठ नवव्या स्थानावर
- राष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठ गटात पुण्यातील चार महाविद्यालये
- महाविद्यालय गटात एक, तर अभियांत्रिकी गटात तीन महाविद्यालये

पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या नॅशनल इस्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) 2020 या वर्षाची यादी जाहीर झाली आहे. एनआयआरएफ यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सलग चौथ्या वर्षी पहिल्या दहामध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यापीठाचे स्थान एक क्रमांकाने उंचावले आहे. त्यामुळे देशातील विद्यापीठांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठ नवव्या स्थानावर आहे. 

- 'कम्युनिटी ट्रान्समिशन'बाबत आरोग्य मंत्रालयाने काय केलाय दावा? वाचा सविस्तर

राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठांच्या क्रमवारीत पहिल्या दहामध्ये स्थान पटकविणारे हे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे. असे असले तरीही देशातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या गटात (ओव्हर ऑल) मात्र विद्यापीठाची कामगिरी घसरली आहे. या गटात यंदा विद्यापीठाचे नामाकंन दोन क्रमांकांनी घसरले असून, यंदा पुणे विद्यापीठ 19 व्या स्थानावर आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ही नामाकंने दरवर्षी जाहीर करण्यात येतात. शैक्षणिक संस्थांचे रॅंकिंग ठरविताना विद्यापीठे, सर्व शैक्षणिक संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, स्थापत्यशास्त्र आणि कायदा अशा एकूण नऊ गट निश्‍चित केले आहेत. या संस्थांचा दर्जा ठरविताना वेगवेगळे निकष पाहिले जातात.

- बारावीच्या विद्यार्थ्यांनो, फार्मसी क्षेत्रात उत्तम रोजगाराच्या संधी कोणत्या आहेत, हे तुम्हाला माहित आहे का?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान
- विद्यापीठाच्या यादीत यंदा 61.13 गुणांसह नवव्या स्थानावर
- गेल्यावर्षी 58.40 गुण होते.
- सर्व संस्थांच्या गटात विद्यापीठाची क्रमवारी घसरली; यंदा 19 व्या स्थानावर
- गेल्यावर्षी सर्व संस्थांच्या गटात विद्यापीठ होते 17 व्या स्थानावर

विद्यापीठाच्या क्रमवारीत पुण्यातील विद्यापीठे :
- विद्यापीठाचे नाव : रॅंकिंगमधील स्थान
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : 9वे
- सिंबॉयसिस इंटरनॅशनल (पुणे) : 43वे
- डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (पुणे) : 46 वे
- भारती विद्यापीठ (पुणे) : 63वे

अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या क्रमवारी पुण्यातील महाविद्यालये :

महाविद्यालयाचे नाव : रॅंकिंगमधील स्थान
- अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) : 50 वे
- डिफेन्स इन्स्ट्यिुट ऑफ ऍडव्हान्स टेक्‍नॉलॉजी : 63वे
- भारती विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग : 99वे

- जगप्रसिद्ध लोणार झालाय गुलाबी; हे आहे त्यामागचे कारण...

महाविद्यालयांच्या रॅंकिंगमध्ये पुण्यातील एकच महाविद्यालय
राष्ट्रीय स्तरावरील महाविद्यालयाच्या रॅंकिंगमध्ये पहिल्या शंभर महाविद्यालयांमध्ये विद्येच्या माहेरघरातील केवळ फर्ग्युसन महाविद्यालय हे एकच महाविद्यालय आहे. या क्रमवारीत फर्ग्युसन महाविद्यालय 56.04 गुणांसह 42 व्या क्रमांकावर आहे.

 

राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाला मिळालेल्या क्रमवारी बाबत आम्ही आनंदी आहोत. रैंकिंगसाठी असलेल्या निकषमध्ये विद्यापीठची कामगिरी समाधानकारक आहे. विशेषत: संशोधन आणि प्रकाशन यामधील कार्य उल्लेखनीय आहे.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune University maintained its position for the fourth consecutive year in NIRF list