तलाव कोरडे पडलेत आणि इंदापूरचा पाटबंधारे विभाग म्हणतंय...

राजकुमार थोरात
Thursday, 14 May 2020

निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी, रेडणी या चार गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. 

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील निरवांगीजवळच्या वाघाळे व रेडणीच्या तलावामध्ये पाटबंधारे विभागाने पिण्यासाठी पाणी सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी, रेडणी या चार गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. 

चासकमानचे पाणी पेटले; 65 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल  

निरवांगीजवळच्या वाघाळे तलावाजवळ निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी गावची पाणी पुरवठा योजनेच्या विहिरी आहेत. या तलावावर तीन गावांचे पिण्याचे पाणी अवलंबून असते. या तलावामध्ये पाणी सोडल्यास तीन गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटतो. तसेच, रेडणी गावाच्या तलावामध्ये पाणी सोडल्यास गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटतो. मात्र, चालू वर्षी पाटबंधारे विभागाने दोन्ही तलावामध्ये पाणी सोडले नाही. त्यामुळे चार गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. 

पुण्यात अडकलेत कामगार... यूपी, बिहार, बंगालच्या मुख्यमंत्र्यांना कोण समजवणार... 

पाणी वाटपाचे नियोजन नसले; तर त्याचे काय परिणाम भोगावे लागत आहेत. याचा अनुभव इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी घेत आहे. पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, शेतीच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. गतवर्षी इंदापूरसह पुणे जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले. परतीचा पाऊस उशिरा आल्यामुळे धरणामध्ये शंभर टक्के पाणी साठा झाला होता. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नीरा खोऱ्यातील धरणामध्ये समाधानकारक पाणी आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये शेतीला व पिण्यासाठी अपेक्षित पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला. नीरा डाव्या कालव्याच्या उन्हाळी हंगामातील पहिल्या आवर्तनाला 15 मार्चपासून सुरवात झाली. मात्र, अधिकाऱ्यांनी पाणी वाटपाचे योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे निमगाव उपविभागामध्ये आवर्तनासाठी विलंब झाला. त्यामुळे इंदापूर पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांचे पीक जळण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने आवर्तनासाठी घाई करीत आहे. तसेच, एकाचवेळी अनेक वितरिका सुरू केल्यामुळे कमी दाबाने शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे. 

शेतकरी नाराज                                          सध्या नीरा डाव्या कालव्याचे पाणी कमी दाबाने येत असून आवर्तनास विलंब लागत असून पिके जळू लागली असल्याने जास्त दाबाने पाणी सोडण्याची गरज आहे, असे मत अभिजित माने यांनी व्यक्त केले. निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ म्हणाले, ""चालू वर्षी पाटबंधारे विभागाने वाघाळे तलावामध्ये पाणी सोडले नाही. त्यामुळे चार गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तातडीने पाणी सोडण्याची गरज आहे.'' 

आदेशानंतरच पाणी सोडणार                   यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे अधिकारी यशपाल भाटिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, निरवांगी व रेडणी तलावामध्ये पाणी सोडण्याचा आदेश नव्हता. संबंधित गावांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांचा पाणी सोडण्याचा आदेशाची प्रत दिल्यानंतर पाणी सोडले जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lakes dry in Indapur taluka, Irrigation department refuses to release water