लाल महालात शिवमहोत्सवाला प्रारंभ,‘शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरांत'

Lal-Mahal
Lal-Mahal

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांकडे युद्ध नीती आणि बौद्धिक कौशल्य तर होतेच. याशिवाय, त्यांनी स्वराज्याचा कारभार चालविण्यासाठी उत्तम प्रशासन व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे एक लढवय्या आणि संवेदनशील राजा निर्माण झाला. छत्रपती शिवरायांचे हे कार्य आणि विचार केवळ पुस्तकात न ठेवता नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी व्यक्त केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने लाल महालामध्ये 13 ते 19 फेब्रुवारीदरम्यान शिवमहोत्सव- 2021 चे आयोजन करण्यात आले आहे. या शिवमहोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (ता.13) अतिरिक्त जिल्हाधिकारी देशमुख आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते झाले. या वेळी देशमुख म्हणाले, शिवरायांचे मोठेपण नैतिक अधिष्ठानात होते. तरुण पिढीने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेउन आणि सध्याची परिस्थिती जाणून पावले टाकावीत. नवीन तंत्रज्ञान अवगत करून तसेच शेती, नोकरी, व्यवसायाच्या माध्यमातून अर्थकारणात सक्षम होण्याची गरज आहे. 

मानकर म्हणाले, छत्रपती शिवरायांची कोथरूडमध्ये शिवसृष्टी होत नाही, ही वेदनादायी बाब आहे. महापालिकेने शिवसृष्टी लवकर उभी करण्यासाठी प्रयत्न करावेत. शिवमहोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष विकास पासलकर म्हणाले, छत्रपती शिवरायांचे विचार सर्वांपर्यंत पोचण्यासाठी ‘शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरांत ही संकल्पना पुढे आली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी शिवरायांनी काळजी घेतली. परंतु सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांचे बळी जात असूनही त्यांच्याकडे राज्यकर्त्यांकडून लक्ष दिले जात नाही, ही खेदाची बाब आहे. या वेळी मराठा सेवा संघाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. 

सूत्रसंचालन विराज तावरे यांनी केले. तर, आभार प्रशांत धुमाळ यांनी मानले. दत्ता सागरे, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले, निलेश इंगवले या वेळी उपस्थित होते. स्नेहल पायगुडे यांनी छत्रपती शिवरायांवर पोवाडा सादर केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन जोशी, रोहित ढमाले, रोहित तेलंग, संतोष पायगुडे आदींनी सहकार्य केले. 

शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन 
शिवकालीन शस्त्र, शिवकालीन वेशभूषा आणि गडकोट किल्ल्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. हे प्रदर्शन 19 फेब्रुवारीपर्यंत खुले असेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com