Leopard : कोलवडी-मांजरी खुर्द परिसरात बिबट्याच्या वावराने घबराट

गेली एक-दिड महिन्यापासून कोलवडी - मांजरी खुर्द (ता. हवेली) परिसरात ऊसाच्या शेतात बिबट्याचा वावर असल्याच्या बातमीने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
Leopard
Leopardsakal

मांजरी खुर्द - गेली एक-दिड महिन्यापासून कोलवडी - मांजरी खुर्द (ता. हवेली) परिसरात ऊसाच्या शेतात बिबट्याचा वावर असल्याच्या बातमीने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वनखात्याने ही बाब गांभीर्याने घेऊन या परिसरात पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोलवडी व मांजरी खुर्द गावाच्या शिवेच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. काही दिवसांपूर्वी येथील एका शेतकऱ्यांच्या उसात बिबट्याचे ठसे आढळून आले होते. तर, एका ठिकाणी उसाची तोडणी सुरू असताना ऊसतोड कामगारांना बिबट्या दिसून आला होता. तेथील काही कुत्रीही गायब झाल्याची तक्रार होती. एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील एक गाईचे वासरू ही या बिबट्याने फस्त केले आहे.

सतिश आव्हाळे, रामभाऊ आव्हाळे, दीपक उंद्रे, शिवाजी शेळके, मच्छिंद्र उंद्रे, सत्यवान उंद्रे, शांताराम उंद्रे, अनिल तुपे आदी शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. येथे ऊस तोडणी सुरू असून तेथील मजूरांनाही बिबट्या दिसल्याने त्यांच्यात घबराट पसरली आहे. दत्तात्रय उंद्रे, अतुल उंद्रे, अक्षय आव्हाळे, प्रमोद उंद्रे यांनी मोबाईलवर या बिबट्याचे शुटींग केले आहे.

गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास

काही शेतकऱ्यांना कामिनी व ऊसाच्या शेतात बिबट्या निदर्शनास आला आहे. त्यांनी त्याचा व्हिडिओही काढला आहे. त्यातून बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्यापासून असलेला धोका लक्षात घेऊन वनखात्याने तेथे पिंजरा लावावा व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात व निर्जन भागात फिरू नये, रात्रीच्यावेळी हातात काठी, बँटरी, गळ्याभोवती मफलर गुंडाळून आवाज करीत फिरावे, असे आवाहन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक आव्हाळे, माजी उपसरपंच किशोर उंद्रे, पोलीस पाटील भारती उंद्रे, जगदीश उंद्रे व वनक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी केले आहे.

'परिसरातून बिबट्या दिसत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. काल पुन्हा बिबट्या दिसल्याचे सांगितल्यानंतर रेस्क्यु टीम व कर्मचारी पाठवले असून तपासणी केली जात आहे. बिबट्याला लपण्यासाठी याठिकाणी पुरेशा प्रमाणात जागा आहे. त्यामुळे त्याचा वावर नाकारता येत नाही.'

- सुरेश वरक, वन परिक्षेत्र अधिकारी, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com