'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ'

helping hands.jpg
helping hands.jpg

पुणे : कोरोनामुळे कित्येक जणांना दोन वेळा जेवण मिळण्याचे सुद्धा अवघड झाले आहे. वाढलेली बेरोजगारी, विशेषतः कामगार वर्ग, विद्यार्थी वर्ग. लघु उद्योग दिवाळखोरीच्या वाटेवर आहेत. यामध्येच दररोज वाढत असलेले कोरोना रुग्ण त्यामुळे सगळ्या बाजूने तयार झालेले नकारात्मक वातावरण आणि मोडलेली आर्थिक घडी यामुळे पुण्यात जणू आत्महत्याचे सत्र सुरू झाले आहे. म्हणून अशा संकट प्रसंगी 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेल्या वचनाप्रमाणे प्रत्यक्षात वागण्याची वेळ आहे. 

लाॅकडाउनच्या काळात बऱ्याच जणांनी अन्नधान्य, जेवण, इतर मेडिकलच्या वस्तू वाटप करून माणुसकी पळाली असली तरी एवढ्याने मदत पुरेशी होणार नाही. आता खरी गरज आहे मानसिक आधार देण्याची. निस्वार्थ पणे पुढे येण्याची. थोडासा आर्थिक फटका सहन करण्याची तरच यातून आपण लवकर बाहेर पडू. काही दिवसांपूर्वीच एका विद्यार्थ्यांचे रूमचे भाडे दिले नाही. म्हणून साहित्य बाहेर फेकून देण्याचा प्रकार झाला होता. त्याचबरोबर अनेक छोटे मोठे व्यवसाय डबघाईला आले असताना मालक भाड्यासाठी तगादा लावत आहेत. घरभाड मागणे गैर नाही पण विद्यार्थीवर्ग, कामगार वर्ग,  कर्ज काढून छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू केलेले हे लोक कोठून भाडे आणणार ? आज याच घटकांना सर्व सधन घटकांनी आधार देण्याचे काम केले पाहिजे. तरच लवकर परिस्थिती पूर्वपदावर येईल. नाहीतर आर्थिक अंदाधुंद माजण्यास वेळ लागणार नाही.

सध्या काळ थोडा कठीण चालू आहे. तो  निघूनही जाणार आहे. शंका घेण्याचे किंचितही कारणच नाही. अनेक हॉटेल्स वाले, भाजी मंडईतील व्यापारी वर्ग, रस्त्यावर छोटी मोठी विक्री करणारा कामगार वर्ग यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एकाच वेळी सर्व या वर्गातील व्यक्ती आर्थिक मंदीमध्ये आल्याचे दिसते. सर्वात जास्त तरुण वर्ग चिंतेत आला  आहे. आयुष्यातील उमेदीच्या वयामध्ये असताना आर्थिक संकट, रोजगाराचा सामना करावा लागणं नक्कीच त्रासदायक आहे. अनेक जणांना रोजगार कसा मिळणार याची चिंता आहे. तर अनेक जणांना रोजगार आहे तो टिकेल की नाही याची चिंता आहे. अश्या दुहेरी कचाट्यात कचाट्यात तरुण वर्ग सापडला आहे.


हे सर्व जरी खर असलं तरी पाठीमागे वळून आपणाला चालणार नाही. आहे त्या परिस्थितीला तोंड दिल्याशिवाय मार्ग नाही. ही परिस्थिती नक्कीच बदलणार आहे. त्यामुळे कुणीही मनातून हरता कामा नये. आपण जर आपल्या आजूबाजूलाच पाहिल तर आपल्यापेक्षाही असंख्य अडचणीत तोंड देत जगत असलेले लोक आपल्याला दिसतात. त्यांचे कष्ट, दुःख पाहिलं तर त्या मानाने आपले दुःख कुठेच नाही असं दिसून येईल. जगण्याच्या असंख्य वाटा आहेत. जिंकणं म्हणजेच तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणे असे नव्हे. जिंकण हा एक अनुभव आहे. तो तुम्ही जगल्या शिवाय कळत नाही. आपणाला फार शेवटी कळते आपण नेमकं आयुष्यात काय जिंकलो आहे ते. आपल्यापेक्षाही ही अनेक लोक खडतर परिस्थिती मध्ये असतात आपण विचारही करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये लोक आपला आयुष्याचा गाडा ओढतात.

यूपी बिहार मधून महाराष्ट्रात येऊन चार हजारांवर एक महिना काम करतात. वर्ष-वर्ष ते घरी जात नाहीत. त्यांनाही ही मुल आहेत. बायको आहे पण परिस्थितीमुळे जाता येत नाही. ज्यावेळेस शेतातील ऊस काढणीवेळी मन हेलावून टाकणाऱ्या गोष्टी आपणाला पाहायला मिळतात. जो ऊस काढण्यासाठी कामगार वर्ग बीड जिल्हा व इतर भागातून पश्चिम महाराष्ट्रात येतो. त्यामध्ये अनेक स्त्रियांनी बाळाला जन्म देऊन सहा महिन्यात झालेले असतात. आपलं सहा महिन्याचं बाळ कुठेतरी पालापाचोळा पाचोळ्यात झोपवून  त्याची आई उसाच्या पेंढ्या त्या ट्रॅक्टरमध्ये शिडीवर चढून भरत असते. कारण तिची जगण्याची तीव्र इच्छा असते म्हणून ती कष्ट सहन करते. कित्येक लोकांच्या आयुष्यात प्रत्येक सेकंदाला ते मरणाच्या उंबरठ्यावर जगत असतात पण ते कधीच हारत नाहीत ते कायम लढतात कष्ट करतात शेवटच्या श्वासापर्यंत प्रचंड इच्छाशक्ती जगण्याची ठेवतात. कित्येक मुलांचा जन्म रस्त्यावरच होतो आणि रस्त्यावरच मरून जातात. मग त्यांनी काय करायचं?

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेतकरी जो वर्षभर रात्र आणि दिवस काम करतो आणि आपलं पीक वाढवतो पण अचानक पाऊस येतो, गारा पडतात आणि होत्याच नव्हतं होत. संकटे त्याला दरवर्षी येतात मग त्यातूनही शेतकरी राजा मार्ग काढतो. तो असाच कित्येक वर्षे कर्जबाजारी असतो. मग त्यांनी काय करायचं ? त्यामुळे आपल्याला मनातून हरून चालणार, आत्महत्येने तर बिलकुल प्रश्न मिटणार नाही, आहे त्या परिस्थितीला तोंड देऊन पुन्हा नव्या जोमाने आपणाला कामाला लागावे लागणार आहे. व एकमेकांना मदतीचा हात देऊन या आलेल्या वैश्विक संकटाशी दोन हात करावे लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com