चासकमान धरणाच्या कालव्यातून अमर्याद विसर्ग 

राजेंद्र लोथे
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

चासकमान (ता. खेड) धरणामधून कालव्याद्वारे सुमारे 44 दिवसांपासून सुरू असलेले आवर्तन अमर्यादपणे सुरू आहे. पाऊस थांबल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होणार आहे. त्यामुळे कालवा नियोजन समितीची बैठक घेऊन आवर्तनाच्या तारखा ठरणार तरी कधी? असा प्रश्‍न लाभधारक शेतकऱ्यांना पडला आहे.

चास (पुणे) : चासकमान (ता. खेड) धरणामधून कालव्याद्वारे सुमारे 44 दिवसांपासून सुरू असलेले आवर्तन अमर्यादपणे सुरू आहे. पाऊस थांबल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होणार आहे. त्यामुळे कालवा नियोजन समितीची बैठक घेऊन आवर्तनाच्या तारखा ठरणार तरी कधी? असा प्रश्‍न लाभधारक शेतकऱ्यांना पडला आहे. धरणात सध्या 98.30 टक्के (8.41 टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. 

चासकमान धरणातील पाणीसाठा प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के असतो व त्यानंतर ऑक्‍टोबर महिन्यात कालवा नियोजन समितीची बैठक होऊन आवर्तनाच्या तारखा जाहीर केल्या जातात. मात्र, अनेक वर्षांपासून नियोजनाचा अभाव असतो. कालवा नियोजन समिती फक्त कागदावरच अस्तित्वात आहे. कारण, ठरलेल्या तारखेनुसार आजपर्यंत धरणातून कधी आवर्तन सुटलेले नाही वा सोडलेले बंद झाले नाही. पाऊस होत नसतानाही 17 जुलै रोजी केवळ 47 टक्के पाणीसाठा असताना धरणातून आवर्तन सुरू करण्यात आले व त्यानंतर जोरदार झालेल्या जोरदार पावसामुळे धरण शंभर टक्के भरले, मात्र गेल्या 15 दिवसांपासून पाऊस थांबलेला आहे. त्यामुळे धरणात येणारा पाण्याचा येवा व धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग, यात तफावत आहे.

शिरूर तालुक्‍यातील दुष्काळ स्थिती पाहता सोडण्यात आलेले हे आवर्तन अव्याहतपणे सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होतो आहे. धरणात 98.30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कालवा नियोजनाच्या बैठकीत पाण्याच्या वितरणाचे कसे नियोजन होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असेल. 

याबाबत धरणाचे शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी सांगितले की, कालव्यातून सुरू असलेले आवर्तन बंद करण्याबाबत कोणतेही नियोजन झालेले नाही. मात्र, लवकरच याबाबत निर्णय होईल. 

कालवा गळतीमुळे नुकसान 
कालव्यातून अमर्यादपणे आवर्तन सुरू आहे. मात्र, कालव्यातून होत असलेल्या गळतीमुळे खेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या जमिनीतील उभी पिके सडून गेली आहेत. त्यातून शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे भुर्दंड सहन करावा लागला आहे. जमिनी क्षारपड झाल्या आहेत. मात्र, याबाबत कोणीही लक्ष देत नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Limitless rotation through the Chaskaman dam`s canal