निराधारांना वाली कोण? दहशतीच्या छायेत काढत आहेत दिवस-रात्र!

labours
labours

पुणे : 'कोरोना'मुळे निराधार झालेले कष्टकरी अद्याप ही रस्त्यावर असून महापालिकेकडून अवघ्या १००-१५० जणांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, अजूनही शहरात शेकडो कामगार रस्त्यावर दिवस-रात्र काढत आहेत. रस्त्यावर झोपल्याने पोलिसांकडून मारहाण होत असल्याने हे कामगार दहशतीच्या छायेत आहेत. रोज दोनवेळा नागरिकांकडून अन्न वाटप केले जात आहे, एवढीच काय ती दिलासादायक बाब आहे. 

शहरात डेक्कन, नारायण पेठे येथील नदीपात्र, महापालिका परिसर, पुणे स्टेशन, स्वारगेट, मार्केटयार्ड, येरवडा, संगम घाट यासह इतर परिसरात अनेक कामगार रस्त्यावर रहात आहेत. पुर्वी ते हाॅटेल, बांधकाम साईट येथे काम करून तेथेच राहत होतो. 'कोरोना'मुळे सर्व काम बंद झाल्याने त्यांना तेथून बाहेर पडावे लागले. आता गावाकडे ही जाता येत नसल्याने हे कामगार रस्त्यावर रहात आहेत.

कामगारांचा प्रश्न समोर आल्यानंतर महापालिकेने त्यांची व्यवस्था शहरातील चार 'नाईट शेल्टर'मध्ये करण्याचा निर्णय घेतला. सेनादत्त पेठे येथील नाईट शेल्टर'मध्ये कामगारांना ठेवण्यास स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. तर इतर तीन ठिकाणी कामगार हलविण्यासाठी पालिकेची साधणांची जुळवाजुळव सुरू असल्याने कामगार रस्त्यावरच आहेत. 

विदारक स्थितीने रडू कोसळले

मूळचे कटक येथील असलेले पिंटू शरमन यांना विदारक स्थिती सांगताना रडू कोसळले. गेले अनेक वर्ष पुण्यात सेंट्रींगचे काम करत आहे, पण असे रस्त्यावर पोलिसांचा मार खात रहावे लागेल असे मला कधीच वाटले नव्हते. मला गावाकडे जायचे होते, पण आता रेल्वे बंद झाल्याने अडकून पडलो आहे,  असे शरमन यांनी सांगितले. 

हरीश अय्यर म्हणाले, "केटरिंगच्या ठेकेदाराकडे काम करत होतो. लग्न सरईचा काळ असल्याने ३१ मार्च नंतर सर्वकाही सुरू होईल असे वाटले होते, म्हणून मी ठाण्याला परत न जाता पुण्यात थांबलो. आता रस्त्यावर रहायची वेळ आली आहे. दादा चंदनशिवे म्हणाले," माझे कुटुंब मोहोळ येथे आहे. पुण्यात मी सेंट्रींगचे काम करताना बांधकाम साईटवरच रहायचो. गावाकडे जाता येत  नाही. नदीपात्रात रहात असलो तरी आंघोळ व इतर गोष्टींची अडचन होत आहे."

मोबाईल पडले बंद

पुण्यात रस्त्यावर राहायची वेळ आली आहे. दोन चार कपडे, सतरंजी, पांघरूण एवढेच सोबत आहे. पैसे थोडेफार होते काहींचे संपले काहींचे आहेत. रस्त्यावर रहात असल्याने मोबाईल चार्जिंगची व्यवस्था नसल्याने बंद पडल्याने घरच्यांशी संपर्क साधता येत नाही, असे प्रदीप शिंपी यांनी सांगितले. 

मनपाच्या शाळेत व्यवस्था का नाही?

पुणे मनपाच्या शाळांच्या अनेक इमारती सध्या बंद आहेत. तेथे निराधार लोकांची राहणे, अंघोळ, स्वच्छता गृह याची व्यवस्था होऊ शकते. सामजिक संस्थांनाही भोजन पुरविण्यासाठी शहरात न फिरता एक-दोन शाळेत जाता येईल. यामुळे सर्वांचीच सोय होणार असताना पुणे मनपा लवकर निर्णय घेत नसल्याने शेकडो कामगार रस्त्यावर रहात आहेत, यावर लवकर निर्णय द्यावा, असे अविनाश बकाल या तरूणाने सांगितले. बकाल व त्याचे मित्र शहरात निराधारांना जेवणाचे पॅकेट पुरवत आहेत. 

"निराधारांच्या निवासाची व्यवस्था नाईट शेल्टरमध्ये केली आहे. यापेक्षा जास्त जणांची रहाण्याची व्यवस्था करण्यासाठी इतर पर्यायांची व्यवस्था करत अाहोच. त्याचा आदेश काढल्यावर ही ती कोठे करणार हे सांगू"
- शंतनू गोयल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com