ताप आलाय तर सरकारी दवाखाना गाठा; खाजगी दवाखान्यांनी ठोकलंय टाळं!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

राज्यातील नोंदणीकृत एमबीबीएस डॉक्टरांची संख्या एक लाख 55 हजार आहे. तर आयुर्वेद, युनानीसह इतर पॅथीच्या वैद्यकीय तज्ज्ञ मिळून ही संख्या तीन लाखांपेक्षा जास्त होते.

पुणे : पुण्यासह आणि राज्यातील प्रमुख शहरांमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी बाह्य रुग्ण विभागातील रुग्णसेवा बंद केल्याच्या तक्रारी आरोग्य खात्याकडे आल्या आहेत. ताप, सर्दी, खोकला असल्यास सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देऊन वैद्यकीय तज्ज्ञ फोन ठेवतात, अशा स्वरुपाच्याही तक्रारींची नोंद होत असल्याचे दिसून आले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमिवर शहरातील फॅमिली फिजियशन आणि मोठ्या रुग्णलयांनी मात्र वैद्यकीय सेवेतून काढता पाय घेतल्याचे चित्र दिसत असल्याची खंत सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी व्यक्त केली. या तक्रारी फक्त पुण्या-मुंबईपुरत्या मर्यादीत नाहीत, तर विदर्भ आणि मराठवाड्यात खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांबद्दलच्याही आहेत. 

याबद्दल जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे (जीपीए) माजी अध्यक्ष डॉ. संताजी कदम म्हणाले, “कोरोनाचा संसर्ग वाढू नये, हे एक त्यामागचे कारण आहे. तसेच, डॉक्टरांची सुरक्षितता हा देखील त्यामागचा भाग आहे. बाह्य रुग्ण विभागाच्या वेळा कमी करून होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी हातभार लावला आहे.” 

- Coronavirus : कोरोनामुळं जगभरात लॉकडाऊन, पण पाकिस्तानात का नाही?

“सरकारी यंत्रणांनी या तक्रारींची वस्तूनिष्ट तपासणी केली आहे का?” असा प्रश्न इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी विचारला. ते म्हणाले, “आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी सर्व दवाखाने सुरू आहेत. त्याच्या वेळा कमी केल्या असतील. पण, पूर्ण बंद केलेली नाहीत. दवाखान्यात स्विपर, असिस्टंट डाँक्टर येत नाही. त्यामुळे दवाखाने कमीत वेळ सुरू ठेवले जात आहेत. काही शहरांमध्ये दवाखान्यात गर्दी दिसली म्हणून डॅक्टरांविरोधात जमावबंदीचा आदेश मोडला म्हणून कारवाईचा इशारा पोलीसांनी दिला. अशा परिस्थितीत वैद्यकीय सेवा करताना अडथळे येत आहेत. ”

- हे नियम मोडल्यास सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद..

डॉक्टरांना पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट काहीच मिळत नाही. सरकारने ते उपलब्ध करावे, अशी मागणीही त्यांनी केली. 
डॉक्टर दवाखाने बंद ठेवतात, ही सरकारची एकतर्फी माहिती आहे. राज्यातील नोंदणीकृत एमबीबीएस डॉक्टरांची संख्या एक लाख 55 हजार आहे. तर आयुर्वेद, युनानीसह इतर पॅथीच्या वैद्यकीय तज्ज्ञ मिळून ही संख्या तीन लाखांपेक्षा जास्त होते. यातील बहुतांश डाँक्टर वैद्यकीय सेवेसाठी सज्ज आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

- Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

ताप आलाय सरकारी रुग्णालय गाठा

पुण्यातील काही खसगी रुग्णालयांनी तापाच्या रुग्णांना सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला रुग्णालयात दाखल होण्याच्या पहिल्याच पायरीवर दिला जातो. कोरोनाच संसर्ग समाजात पसरल्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालयातील इतर रुग्णांना आणि डाँक्टरांना कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रुग्णालयांतर्फे देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private clinic and hospitals in the state were closed due to spreading of coronavirus