पुणे पोलिस आयुक्तालयामध्ये दोन पोलिस ठाण्यांचा समावेश; गृह विभागाचा ग्रीन सिग्नल!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या निर्मितीवेळी ग्रामीण पोलिस दलामध्ये असलेल्या लोणी काळभोर, लोणीकंद आणि हवेली या पोलिस ठाण्यांचा पुणे पोलिस आयुक्तालयात समावेश करावा, याबाबतचा प्रस्ताव पुणे पोलिस आयुक्तालयातून राज्याच्या गृह विभागामध्ये पाठविण्यात आला होता.

पुणे : शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीतील मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या लोणीकंद आणि लोणी काळभोर या दोन पोलिस ठाण्यांचा पुणे पोलिस आयुक्तालयात अखेर समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाकडे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पुणे पोलिस आयुक्तालयाच्या प्रस्तावाला गृह विभागाने ग्रीन सिग्नल दिला. त्याबाबतची अधिसूचना सोमवारी (ता.२६) काढण्यात आली.

दसऱ्याला सोने-चांदीची अपेक्षेपेक्षा जास्त विक्री; पुण्यातील सराफांनी केला दावा​

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या निर्मितीवेळी ग्रामीण पोलिस दलामध्ये असलेल्या लोणी काळभोर, लोणीकंद आणि हवेली या पोलिस ठाण्यांचा पुणे पोलिस आयुक्तालयात समावेश करावा, याबाबतचा प्रस्ताव पुणे पोलिस आयुक्तालयातून राज्याच्या गृह विभागामध्ये पाठविण्यात आला होता. मागील अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. त्यासाठी सातत्याने पाठपुरावाही केला जात होता. मात्र, त्यास प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर गृह विभागाचे तत्कालीन विशेष पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी सांभाळलेले आणि सध्या पुणे पोलिस आयुक्त असलेल्या अमिताभ गुप्ता यांनी यासंबंधीचे सर्व प्रस्ताव तपासले. त्याचा पुन्हा एकदा पाठपुरावा केला. त्यानंतर एका महिन्यातच दोन्ही पोलिस ठाण्यांचा समावेश पुणे पोलिस आयुक्तालयात झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबतचा आदेश गृह विभागाकडून सोमवारी काढण्यात आला. 

'मुख्यमंत्र्यांनी बोलण्यापेक्षा करून दाखवावे!'

लोणीकंद झोन 4 मध्ये, तर लोणी काळभोर झोन 5 मध्ये समावेश 
लोणीकंद पोलिस ठाणे परिमंडळ 4 आणि सहायक पोलिस आयुक्त, येरवडा विभागाला आणि लोणी काळभोर पोलिस ठाणे परिमंडळ 5 सहायक पोलिस आयुक्त, हडपसर विभागाला जोडण्यात आले आहे. आवश्‍यक कर्मचारी आणि गुन्ह्यांचे आदानप्रदान प्रक्रिया येत्या 2 ते 4 दिवसात पूर्ण करून एक नोव्हेंबरपासून ही पोलिस ठाणी शहर पोलिस दलात समाविष्ट केली जाणार आहेत.

सध्या लोणी काळभोर पोलिस ठाण्यात एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दोन पोलिस निरीक्षक, चार सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि चार पोलिस उपनिरीक्षक असे दहा अधिकारी तर साठ पोलिस कर्मचारी आहेत. तर लोणीकंद पोलिस ठाण्यात एक पोलिस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षक असे सात अधिकारी आणि अठ्ठावन्न पोलिस कर्मचारी आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loni Kand and Loni Kalbhor police stations have been included in the Pune Police Commissionerate