आंबेगावात पिके जमीनदोस्त, पोल्ट्री- गोठ्यांचे नुकसान

ambegoan cyclone
ambegoan cyclone
Updated on

पुणे : आंबेगाव तालुक्यात चक्रीवादळाने शेकडो एकर पिकांचे नुकसान झाले. फळबागा भुईसपाट झाल्या. घरे, पोलट्री, गोठे यांचे शेड उडाले. ठिकठिकाणी झाडे व विजेचे खांब कोसळले. वीज पुरवठा खंडित झाल्याचा मोठा फटका बसला. 

मंचर : आंबेगाव तालुक्यात मंचर, अवसरी खुर्द, लांडेवाडी, वडगाव काशिंबेग, गावडेवाडी, पिंपळगाव खडकी या भागात चक्रीवादळामुळे तीनशे एकर ऊस पीक, दोनशे एकर मका व वीस एकर डाळिंबाच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पत्रे उडून गेले असून, अवसरी खुर्द येथे घरांचे, गोठ्यांचे, पोल्ट्रीचे नुकसान झाले आहे. शेतात साठवून ठेवलेला कांदाही भिजल्याने कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. महसूल कृषी खात्याने अजून पंचनामे केले नाहीत. खडकी येथे सेवानिवृत्त अभियंते बाळासाहेब पोखरकर यांची पाच एकर क्षेत्रातील डाळिंबाची बाग, ऊस पीक, सुलतानपूर येथील रामचंद्र शिंदे यांचे ऊस पीक अवसरी खुर्द येथे पोल्ट्री शेड व गाईंचे गोठ्यांचे नुकसान झाले आहे . अनेक शेतकऱ्यांनी शेतातच कांदा पीक साठवून ठेवले होते. पावसामुळे ताडपत्री उडून गेल्याने दीड हजार पिशव्यांतील कांदा पीक भिजले आहे.

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, नारोडी, गिरवली परिसरात काल झालेल्या चक्री वादळ व पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातही बराकीत साठवलेला कांदा, झाडावरील आंबे व शेतात उभी असलेली बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.काल 2 वाजल्यापासून या परिसरात आज सायंकाळ 5 वाजे पर्यंत लाईट पूर्ण बंद होती. नारोडी येथील चाफमळा परिसरात बाभळीचे झाड विजेच्या खांबावर पडल्यामुळे तीन खांब उन्मळून पडले. विजेच्या तारा तुटल्या . वीज पुरवठा बंद असल्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही. घोडेगाव येथे सह्याद्री धाब्याजवळ एक वडाचे झाड मंचर- भीमाशंकर रस्त्यावर एका मोटारीवर पडले . पोलिस ठाण्याचे वाहन पेट्रोलिंग करीत असताना भर पावसात व वादळात घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, पोलिस अमोल काळे, स्वप्नील कानडे यांनी गाडीत अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. भवानी माळ येथे एका घरावर झाड पडले. गिरवली, आमोंडी, कोळदारे, शिंदेवाडी, धोंडमळ, शिनोली, चिंचोली, गोनवडी येथील आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. 2 हजार झाडांवरील आंबे वाऱ्यामुळे गळून पडले. जवळजवळ 50 टक्केहुन अधिक आंबे जमिनीवर पडले . गोणवडी येथील विजेचे 2 खांब पडले. येथील मधुकर दौंड, ज्ञानेश्वर दौंड यांचे घराचे नुकसान झाले. सुरेश दौंड यांच्या कांदा बराकीचे नुकसान झाले. मधुकर दौंड यांच्या पॉल्ट्रीचे छत उडाले. गोहे खुर्द येथील गाडेकर वस्तीवरील जिजाबाई गाडेकर, भागूजी गाडेकर, लुमजी गाडेकर, शांताबाई गाडेकर, संजय गाडेकर याच्या घरांचे नुकसान झाले. घरातील धान्य, कपडे भिजून गेले.

महाळूंगे पडवळ : आंबेगाव तालुक्यात कळंब, लौकी, चांडोली बुद्रूक, साकोरे, महाळुंगे पडवळ, चास परिसरात निसर्ग वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वादळाचा सर्वाधिक फटका पोल्ट्री, गोठ्याचे पत्रे, पिके, पॉलिहाउस, फळबागा आदींना मोठया प्रमाणात बसला.
ठाकरवाडी- चास येथे ३० एकर बाजरी, १२ घरांना तडे गेले आहेत. २० गोठे व ३० कांदा चाळींचे पत्रे उडाले आहेत. साकोरे येथे एकनाथ गाडे यांच्यासह १० जणांचे गोठयाचे पत्रे उडाले असून, परिसरातील पोल्ट्री शेडचे देखिल नुकसान झाले आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे वादळाने कंबरडे मोडले आहे.महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाच्या जीवशास्त्र प्रयोगशाळा, ग्रंथालय व क्रिडा दालनाचे पत्रे उडाले आहेत. तसेच, घरांचेही नुकसान झाले आहे. लौकी येथे नंदाराम थोरात, दिनकर थोरात, विजय थोरात यांची घराची कौले, लक्ष्मण थोरात, पोपट थोरात यांच्या गाईच्या गोठयांचे पत्रे उडाले आहेत. आंबा, डाळिंब, पेरू, चिंकूच्या बागांचेही नुकसान झाले. कळंब येथे घरांचे व गोठ्यांचे नुकसान झाले आहे. सुहास चिखले यांच्या पॉलिहाउसचा कागद वादळाने उडून गेले आहे.  

पारगाव  : पोंदेवाडी येथील बाबाजी लक्ष्मण दौंड, हौसाबाई बबन पोखरकर, रखमा रभाजी रणपिसे, यांच्या घरांवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले, तर सरपंच अनिल वाळुंज यांच्या शेतातील सर्व आंब्याच्या झाडावरील कच्च्या कैऱ्या गळून पडल्याने नुकसान झाले. परिसरातील विजेचे अनेक खांब उन्मळून पडल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. खडकवाडी येथील कविता संतोष डोके यांच्या शेतातील शेवग्याची 500 झाडे जमिनदोस्त झाल्याने सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एकनाथ सुक्रे यांच्या गाडीवर झाड कोसळले. धामणी येथील पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांच्या पोल्ट्री फार्मचे चक्री वादळाने पत्रे उडून गेल्याने सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पोल्ट्रीमध्ये आठ हजार अंड्यावरील कोंबड्या आहेत. त्यापैकी 250 कोंबड्या मेल्या असून, शेकडो कोंबड्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.

निरगुडसर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील निरगुडसर, भराडी, जवळे, खडकी, शिंगवे, वळती, गांजवेवाडी, रांजणी, थोरांदळे, जाधववाडी, नागापूर परिसराला निसर्ग वादळाचा फटका बसला. उभ्या पिकांच्या नुकसानीबरोबर विजेचे खांब कोसळून तारा तुटल्या. अनेक शेडचे पत्रे उडाले. कांदा चाळीवरील कौले उडून कांदा भिजला आहे. निरगुडसर येथे गावठाण व वळसेमळा येथे काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या आहेत. वळसेमळ्यातील हनुमंत वळसे यांच्या घराचे पञ उडाले, विजया हिंगे यांच्या घरावर झाडे कोसळून नुकसान झाले. फत्तेसिंग वळसे यांच्या गोठ्यावरील पत्रे उडून एक गाय जखमी झाली.भराडी येथील गावठाणात विजेच्या तारा तुटल्या, तसेच महादेव मंदिराजवळच्या विजेचे खांब पडले. गावातील लोहार काम करणाऱ्या कुटुंबियांची झोपडी वा-याने उडाल्याने कुटुंब उघडयावर पडले. भराडी येथील खडकी रस्त्यावरील स्ट्रीट लाईटचे खांब पडले. जांभळेमळ्यातील बाळासाहेब खिलारी यांच्या कांदा चाळीवरील कौले उडुन कांदा भिजला. गायरानातील ग्रामपंचायतीने लागवड केलेल्या आंबा, लिंबू, नारळाची फळे पडून नुकसान झाले. बाळासाहेब ढवळे यांच्या बागेतील कै-या पडुन नुकसान झाले. थोरांदळे येथील डोंगरमळा, गावठाण, विश्वासरावमळा येथील विजेचे खांब कोसळुन अनेक ठिकाणी तारा तुटल्या. श्याम टेमगिरे यांच्या गोठयावर झाड व विजेचा खांब कोसळुन नुकसान झाले. तसेच, कुंदन घायत़डके व संतोष विश्वासराव यांच्या शेडचे पत्रे उडाले. नागापूर येथील थापलिंग गडानजीक, गावठाण, ढोलेमळा या ठिकाणी विजेचे खांब काही वाकले, तर काही कोसळले. विजेच्या ताराही तुटल्या. गणेश पोहकर व गोकुळदास निकम यांच्या गोठयावरील पत्रे उडाले. येथील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन खांब उभारणीचे काम सुरु केले आहे. शिंगवे- येथील गोरडेमळा, माळीमळा, वर्देमळा, साकोरेमळा येथील विजेचे खांब कोसळुन तारा तुटल्या, तसेच अभय भंडारी व लक्ष्मण गाढवे यांच्या पाॅलिहाउसचा कागद उडून नुकसान झाले. तसेच, पांडुरंग कासार, गोरक्ष शिंदे व भोंडवे सर यांचे पत्रा शेड उडाले. वळती येथील गावठाणातील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले, तसेच स्वामी समर्थ मंदिराजवळ विजेचे खांब पडुन तारा तुटल्या. गांजवेवाडी येथील भरत लायगुडे यांच्या कांदा चाळीवरील पत्रे उडुन नुकसान झाले. तसेच, सचिन अशोक गांजवे, बाळू गांजवे, किसन थिटे यांच्या गोठा व पडवीवरील पत्रे उडुन नुकसान झाले.

सातगाव पठार : परिसरात काल झालेल्या चक्रीवादळाने माळी मळा येथील सुधाकर रासकर यांच्या गाईच्या गोठा व घराची कौले उडून गेली. संतोष भिकाजी धुमाळ व श्यामराव रघुनाथ काळे यांच्या पॉलिहाउसचे शेड नेट व पत्रे पूर्ण उडून गेले आहेत. प्रमोद धुमाळ यांच्या पोल्ट्रीचे सर्व पडदे, वळईवरील व पडवीचे पत्रे उडाले आहेत. वेताळबुवा मंदिराजवळील खांबाच्या विजवाहक तारा तुटल्या आहेत. तळेकर वस्तीवर जाणाऱ्या रस्त्यावर मोठे बाभळीचे झाड आडवे पडले आहे. वलखेड वस्ती येथील पोलिस वायरलेस कार्यालयाजवळ असलेले गणेश मंदिराचे मंडपाचे सर्व पत्रे उडाले आहेत. थुगाव येथील प्राथमिक शाळेच्या आवारात एक जुने मोठे झाड पडले आहे. येथील शेतकरी शिवराम एरंडे यांच्या घराची सर्व कौले उडून घरात पावसाचे पाणी साचले आहे. श्री क्षेत्र सौरंग्या डोंगरावरील श्री दत्त मंदिराच्या स्लाईडिंग खिडक्यांच्या काचा फुटून मंदिरात काचांचा खच पडला आहे. मंदिर परिसरातील दोन विजवाहक पोल पडून तारा आजूबाजूला विखरून पडल्या आहेत. मंदिरातील भाविकांना पाणी पुरविणारी 2 हजार लिटर क्षमतेची टाकी उडून डोंगराखाली पडून तुकडे झाले आहेत. पेठ येथील विनोद आनंद धुमाळ यांच्या घराजवळील लाईट पोल उन्मळून पडले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 जुनी मोठी निलगिरीची झाडे आडवी झाल्याने रुग्णांना दवाखान्यात येण्याचा मार्ग बंद झाला. पंचायत समितीचे माजी सदस्य मनोहर भालेराव यांच्या घराला लागून असलेल्या पडवीचे पत्र्याचे शेड उडून गेले. दिलीप पवळे यांची वळई वाऱ्याने उडून नुकसान झाले आहेत. श्रीकांत गोविंद धुमाळ या शेतकऱ्यांच्या बागेतील आंबे, चिक्कू, डाळिंब व इतर झाडे पूर्ण उन्मळून पडली आहेत. संपूर्ण वादळात प्रचंड मोठ मोठे घोंगावणारे वारे वाहत असल्याने व पाऊस चालू असल्याने घराबाहेर पडण्यास नागरिक घाबरत होते. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले. त्यामुळे काल सकाळी वीजपुरवठा खंडित झाला. तो आज दुपारपर्यंत खंडित होता. अनेक शेतकऱ्यांची कांद्याची चाळ भिजली. पत्रे उडाले. घराचे व जनावरांचे गोठे उध्वस्त झाले. भावडी शाळेतील सांस्कृतीक कलामंचाचे पत्रे उडून गेले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com