
MAHA CONCLAVE : सहकार क्षेत्रावर अन्याय होतोय, या दाव्यांवर अमित शहा स्पष्टचं बोलले; म्हणाले...
पुणे - सहकार क्षेत्रावर अन्याय होतो, अशी तक्रार नेहमी केली जाते. पण आम्ही कर कमी केले आहेत. या तक्रारीत तथ्य नाही, असा दावा केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी केला आहे. सकाळ समूहाच्या वतीने पुण्यात आयोजित सहकार महापरिषदेत ते बोलत होते.
अमित शहा म्हणाले की, सहकर क्षेत्रावर अन्याय होतो अशी नेहमी तक्रार नेहमी केली जाते. पण आम्ही कर कमी केले आहेत. या तक्रारींमध्ये काहीही तथ्य नाही. सहकारासाठी आम्ही विद्यापीठाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रावर अन्याय केला जातोय अशा आरोपांमध्ये तथ्य नाही. सहकार क्षेत्राला पहिल्यांदा टॅक्समध्ये फायदा मिळाला आहे. याशिवाय सेंद्रीय शेती करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान शेतकऱ्यांना शेतमाल निर्यात करायला मोठी अडचण येते. आम्ही सहकारी तत्वावर अशी यंत्रणा निर्माण करत आहोत, जी शेतकऱ्यांना थेट परदेशात आपला भाजी विकता येईल, असं शहा यांनी म्हटलं. शिवाय २० टक्के इथेनॉल मिक्स करण्याचं आश्वासन दिलेलं असून सध्या आपण १२ टक्के मिक्स करत आहोत. त्यामुळे साखर कारखान्यांना लाभ होणार असल्याचं अमित शहा यांनी स्पष्ट केलं.
शहा म्हणाले की, सहकार हा मुख्यत्वे राज्याचा विषय. आज सहकाराची चर्चा होते तेव्हा त्यात काय होणार असा प्रश्न विचारला जातो. मात्र २१ टक्के साखर सहकारी संस्थांमधून निर्मित होते. दूध-गहू सहकारातून खरेदी होते. धान्याची खरेदी सहकारी संस्थांकडून होते. ग्रामीण अर्थकारणाला सहकार चालना देते आणि मोठे करते. सहकार क्षेत्र बिनकामाचं होतंय असं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तस कधीच होणार नाही. याउलट पुढील दशकात सहकारिता क्षेत्र मोलाची भूमिका निभावणार असल्याचं ते म्हणाले.