Maratha Kranti Morcha: पुणे मुंबई महामार्गावर ठिय्या आंदोलन; औंध येथे शांततेत मोर्चा

बाबा तारे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सर्व आंदोलकर्त्यांनी सकाळी राधा चौकात एकत्र येत तेथून शिवछत्रपती क्रिडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेंगलोर-पुणे-मुंबई महामार्गावर जवळपास एक तास ठिय्या आंदोलन केले. यादरम्यान महामार्गावरील संपुर्ण वाहतुक बंद करण्यात आली होती.

पुणे (औंध) - सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंद दरम्यान औंध, बाणेर, बालेवाडी, म्हाळूंगे (पाडाळे) परिसरातील मोर्चेकऱ्यांनी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केले तसेच नागरीकांनीही शांततेत सहकार्य केले. या दरम्यान म्हाळूंगे, बाणेर, बालेवाडी येथील सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या आंदोलनात मराठा समाजातील सर्व संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक रहिवाशी यांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेतला होता.

सर्व आंदोलकर्त्यांनी सकाळी राधा चौकात एकत्र येत तेथून शिवछत्रपती क्रिडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेंगलोर-पुणे-मुंबई महामार्गावर जवळपास एक तास ठिय्या आंदोलन केले. यादरम्यान महामार्गावरील संपुर्ण वाहतुक बंद करण्यात आली होती. रोज हजारो वाहनांच्या हॉर्नच्या गोंगाटाने गजबजलेल्या महार्गावर 'एक मराठा लाख मराठा', 'शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीत आरक्षण मिळालेच पाहिजे' व सरकारच्या विरोधात दिल्या जाणा-या घोषणांचा आवाज घुमला. परिसरातील नागरीकांनी या आंदोलनात उत्सफुर्त सहभाग घेऊन महामार्गावर शांततेत ठिय्या आंदोलन केले. चतुःश्रृंगी पोलिस ठाणे व हिंजवडी पोलिस ठाण्याच्या वतीने यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परिसरातील दवाखाने, मेडीकल या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदार,व्यावसायिक यांनी मोर्चेकऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली होती. आंदोलन काळात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारीही सर्वच मोर्चेकऱ्यांनी घेतलेली यावेळी दिसून आली.

औंधमध्येही शांततेत मोर्चा
येथील मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करुन गावठाण, मेडीपॉइंट, कस्तुरबा गांधी वसाहत, इंदिरा गांधी वसाहतीसह परिसरातील सर्व भागात मोर्चा काढून सरकारच्या विरोधात घोषणा देत आरक्षणाची मागणी केली. या बंद दरम्यान औंध परिसरात सर्वच भागात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात, सरकारी नोकऱ्यांत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी सर्वांनीच मागणी केली. या मोर्चात औंधगाव व परिसरातील बहुसंख्य मराठा बांधव उपस्थित होते.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Bandh at pune mumbai highway