अन् अजित पवार एक्स्प्रेस निघाली सुसाट वेगाने

मिलिंद संगई
Wednesday, 1 January 2020

प्रशासनाची पळापळ सुरु....
मुरब्बी व प्रशासनाची रेघ न रेघ माहिती असलेल्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर आपल्या स्टाईलने कामास सुरवात केल्यानंतर मंत्रालयापासून जिल्हा स्तरावर अधिका-यांनीही पळापळ सुरु केली आहे.

बारामती : मंत्रीपदी निवड झाल्यानंतर हारतुरे आणि सत्काराचे कार्यक्रम टाळत प्रत्येक दिवस महत्त्वाचा या नियमानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामाचा धडाका सुरु केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सार्वजनिक हिताच्या कामांना प्राधान्य या त्यांच्या स्वभावानुसार शपथविधीनंतर लगेचच मुंबईत मंत्रालयात त्यांनी मुख्य सचिवांसह प्रमुख अधिका-यांच्या बैठका घेत आढावा घेतला. सकाळी पहाटेपासून ते रात्री उशीरापर्यंत काम करत त्यांनी विविध प्रश्न समजून घेतले. शपथविधीनंतर लगेचच दुस-या दिवशी मंत्रालयात दालन घेत त्यांनी राज्याची स्थिती समजून घेतली. रात्री उशीरापर्यंत त्यांनी विविध प्रश्नांबाबत विविध अधिका-यांकडून माहिती घेत नव्या वर्षाचे नियोजन करण्याच्या सूचना सर्वांना दिल्या. 

कोरेगाव भीमा : विजयस्तंभास अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन

मुंबईतून रात्री उशीरा निघून ते पहाटे कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहोचले. वरिष्ठ पोलिस व महसूल अधिका-यांशी त्यांनी चर्चा केली व परिस्थितीची माहिती घेतली. प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी व पोलिस विभागाच्या प्रमुख अधिका-यांनी अजित पवार यांना दिली. या भेटीतही पवार यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी प्रमुख विषयांबाबतही चर्चा करुन आगामी वर्षात करायच्या विविध कामांचे नियोजन तातडीने करण्याच्या सूचना त्यांना दिल्या. 

मुळातच काम सुरु करण्यास दोन महिन्यांचा उशीर झालेला आहे ही बाब विचारात घेता इतर बाबींना फाटा देत थेट कामावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना अजित पवार यांनी सर्व सचिव व प्रमुखांना दिल्या आहेत. या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रशासनाकडून त्याच पध्दतीने सहकार्याची अजित पवार यांची अपेक्षा आहे. 

प्रशासनाची पळापळ सुरु....
मुरब्बी व प्रशासनाची रेघ न रेघ माहिती असलेल्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर आपल्या स्टाईलने कामास सुरवात केल्यानंतर मंत्रालयापासून जिल्हा स्तरावर अधिका-यांनीही पळापळ सुरु केली आहे. विविध विषयांच्या फाईल्स अपटूडेट करण्यासोबतच प्रश्नांची माहितीही अधिकारी बारकाईने करुन घेत आहेत. अजित पवार यांच्या समोर जाताना अभ्यास करुन जावे लागते याची अनेकांना माहिती असल्याने प्रशासनही आता खडबडून जागे झाले असल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Dy CM Ajit Pawar starts work in government