

मुंबई, ता. ११ : सांस्कृतिक कार्य विभागाने ४ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार मंत्रालय परिसर आणि विधानभवन येथे प्रत्येकी एक ‘कालायन’ उपकरण बसविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या दोन उपकरणांसाठी १० लाख ९७ हजार ४०० रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. मंत्रालयाचे ज्योतिष मार्गदर्शन केंद्र करणारा हा शासन निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, प्रवीण देशमुख ,नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, श्रीपाल ललवाणी यांनी केली आहे
समितीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, भारतीय ज्ञानाच्या नावाखाली खगोल विज्ञान आणि ज्योतिष यांची सरमिसळ करणारा हा निर्णय आहे. शासन निर्णयात सांगितल्याप्रमाणे हे केवळ वेळ दाखविणारे घड्याळ नसून या मध्ये राशी, नक्षत्रे, पंचांग अशा सर्व गोष्टींची प्रमाण वेळेशी सरमिसळ केली आहे. खगोलशास्त्रीय माहिती आणि ज्योतिष यांना एकाच ‘विज्ञानाधारित’ चौकटीत मांडणे दिशाभूल करणारे आहे.
मंत्रालय हे महाराष्ट्राच्या प्रशासनाचे केंद्र आहे. विधानभवन हे लोकशाहीचे सर्वोच्च संस्थात्मक व्यासपीठ आहे. या ठिकाणी शासनाने अशा उपकरणाला अधिकृत स्थान देणे म्हणजे अप्रत्यक्षपणे ज्योतिषीय विचारांना शासकीय प्रतिष्ठा देण्यासारखे आहे,असे देखील प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
पंचागाच्या अभ्यासाला विरोध नाही
अंनिसचा भारतीय संस्कृती, पंचांग किंवा पारंपरिक कालगणनेच्या अभ्यासाला विरोध नाही. भारतीय कालगणनेचा इतिहास, प्राचीन भारतीय खगोलशास्त्रातील योगदान आणि विविध कालमापन पद्धती यांचा अभ्यास व प्रदर्शन निश्चितच केले जाऊ शकते. परंतु त्यासाठी खगोलशास्त्र आणि ज्योतिष यांच्यातील स्पष्ट सीमारेषा कायम ठेवणे आवश्यक आहे, असेही अंनिसच्या पत्रकात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.