

नुकसानभरपाई टाळण्यासाठी पावसाचा अहवाल बदलल्याचा आरोप
--
माजी खासदार संजय पाटील यांच्याकडून चौकशीची मागणी
--
ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली : विसापूर आणि येळावी मंडलांमध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या पावसाच्या नोंदी विमा कंपनी आणि कृषी सहाय्यकाने संगनमताने बदलल्याचा आरोप माजी खासदार संजय पाटील यांनी केला. प्रत्यक्षात ५१ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला असताना तो कमी दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
रविवारी (ता. १७) आयोजित पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, ‘‘पावसाच्या नोंदीसाठी ‘स्कायमेट वेदर स्टेशन’ कंपनीने विविध ठिकाणी हवामान केंद्रे उभारली आहेत. २२ एप्रिल रोजी विसापूर आणि येळावी भागात मोठा पाऊस झाला होता. या भागात द्राक्षबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष विमा घेतला आहे.’’
‘‘विमा अटींनुसार ५१ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना प्रतिगुंठा ३८०० रुपये नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष हवामान केंद्रावर जाऊन घेतलेल्या नोंदीनुसार विसापूर येथे ५९.८ मिलिमीटर, तर येळावी येथेही ५९.८ मिलिमीटर पाऊस झाला होता. मात्र कृषी सहाय्यकाने ६ मे रोजी पाठविलेल्या अहवालात विसापूर येथे ३८.०३ मिलिमीटर आणि येळावी येथे ४०.३ मिलिमीटर पावसाची नोंद दाखविली आहे,’’ असा आरोप त्यांनी केला.
या बदललेल्या अहवालाच्या आधारे विमा कंपनी शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसानभरपाई देणार असल्याचा दावा करत पाटील म्हणाले, ‘‘ही सरळ शेतकऱ्यांची फसवणूक आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘ज्या भागांत द्राक्षबागा कमी आहेत, त्या ठिकाणी अचूक पावसाची नोंद दाखवून मदत दिली जाते. मात्र ज्या भागांत द्राक्षबागा मोठ्या प्रमाणावर आहेत, तेथे पावसाच्या नोंदीत फेरफार केल्याचे गेल्या काही वर्षांत निदर्शनास आले आहे. यासंदर्भातील पुरावे कृषिमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहेत.’’
या प्रकरणात कृषी सहाय्यक आणि संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांमधील फोन कॉल्स, तसेच व्हॉट्सॲप चॅटची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
या वेळी महेश पाटील, नितीन पाटील, संदीप पाटील आणि अमित पवार उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.