वीजयंत्रणा उभारण्यासाठी कृती आराखडा तयार; अडीच हजारांहून विजखांबांचे नुकसान!

Rain_damage
Rain_damage

पुणे : चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 2 हजार 650 वीजखांब नादुरुस्त झाले आहेत. ही वीजयंत्रणा पुन्हा उभारण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. दुरुस्ती कामांसाठी विविध योजनेतील कंत्राटदारांचे सहाय्य घेतले जात असून महावितरणचे इतर भागातील अभियंते व कर्मचारी यांना प्रतिनियुक्तीवर दुरुस्ती कामांसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिली. 

गेल्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन नाळे यांनी तडाखा बसलेल्या वीजयंत्रणेची व दुरुस्ती कामांची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी अभियंते व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून विविध अडचणी समजून घेतल्या. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी झुंज देणाऱ्या सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. 

वीजयंत्रणेची ताबडतोब दुरुस्ती करून किंवा पर्यायी तसेच इतर तात्पुरत्या व्यवस्थेतून सर्वप्रथम वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. सद्यस्थितीत मावळ व जुन्नर भागातील 78 वगळता जिल्ह्यातील सर्व वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत खंडित वीजपुरवठ्याबाबत ग्राहकांनी नोंदविलेल्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम वेगाने सुरु आहे. या संकटाच्या कालावधीत वीजग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहनही नाळे यांनी केले. 

मावळ, जुन्नर तालुक्‍यांच्या दुर्गम व अतिदुर्गम, घनदाट झाडांच्या भागात वीजयंत्रणेची पुन्हा उभारणी करण्यास वेग देण्यासाठी महावितरणच्या विविध योजनेतील जिल्ह्यातील कंत्राटदारांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसह पाचारण करण्यात आले आहे. हे कंत्राटदार व कर्मचाऱ्यांना आवश्‍यक साधनसामग्रीसह रवाना झाले आहे. यासोबतच जिल्ह्यातील इतर भागातील अभियंते व कर्मचारी सुद्धा प्रामुख्याने मावळ, जुन्नर आदी भागात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत. वीजयंत्रणेच्या उभारणीसाठी दुरुस्ती कामाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याप्रमाणे नियोजनपूर्वक काम करण्यात येत आहे, असेही नाळे म्हणाले. 

शहरातील वीजपुरवठा सुरळीत 
पुणे शहरातील कोंढवा येथील एक तर वाकड व हिंजवडी परिसरातील तीन रोहित्रांचा, तसेच भोसरीमधील एस ब्लॉकमधील दोन रोहित्राचा पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यांच्या दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून शुक्रवारी उशीरापर्यंत तेथील वीज पुरवठा सुरळीत होईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले. झाडे व फांद्या पडल्याने अनेक ठिकाणी वीजतारा तुटल्यामुळे शहराच्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. तो सुरळीत करण्यात आला आहे.

तसेच सर्व्हिस लाइनवर फांद्या पडल्यामुळे त्या तुटल्या होत्या. त्या देखील दुरूस्तीचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील जवळपास सर्वच भागातील वीज पुरवठा आज सायंकाळपर्यत सुरळीत झाला असल्याचा दावाही महावितरणकडून करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com