गावाकडचं जुगाड, साधी सायकल अशी बनवा इलेक्‍ट्रिक  

राजेंद्र सांडभोर
Wednesday, 16 September 2020

नवीन इलेक्‍ट्रिक सायकल घ्यायची असेल, तर कमीत कमी तीस हजार रुपये खर्च असतो. पण, आता तुमची वापरातील सायकलच माफक खर्चात इलेक्‍ट्रिक करून दिली जात आहे. या ई सायकलची बॅटरी तीन ते चार तास चार्ज केली की, सायकल साधारण 20 ते 25 किलोमीटरपर्यंत चालवता येऊ शकते.

राजगुरुनगर (पुण) : सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोलच्या खर्चातून काहीसा दिलासा मिळू शकेल. खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील संतोष कुलकर्णी हे रोजच्या वापरातील सायकलला माफक खर्चात इलेक्‍ट्रिक सायकलमध्ये रूपांतरित करून देत आहेत. 

मोदी सरकारने शेतकऱ्यांना रडवलेच

नवीन इलेक्‍ट्रिक सायकल घ्यायची असेल, तर कमीत कमी तीस हजार रुपये खर्च असतो. पण, आता तुमची वापरातील सायकलच माफक खर्चात इलेक्‍ट्रिक करून दिली जात आहे. या ई सायकलची बॅटरी तीन ते चार तास चार्ज केली की, सायकल साधारण 20 ते 25 किलोमीटरपर्यंत चालवता येऊ शकते. ही बॅटरी आपण घरातही चार्ज करू शकतो. ज्यांचे काम 20 ते 25 किलोमीटरच्या परिघात असेल, त्यांच्यासाठी ही सायकल वेळ, पैसा आणि श्रम वाचविणारी आहे. शिवाय अप्रत्यक्षपणे पर्यावरणासही पूरक ठरणारी आहे. तिचे इलेक्‍ट्रिक रूपांतर तुमच्या मोटरसायकलला पर्याय ठरू शकते. 

यंदा अधिक मासावरही कोरोनाचे संकट, जावईबापूंचा हिरमोड
  
350 वॅटची मोटार 
ई-सायकलच्या किटमध्ये इलेक्‍ट्रिक मोटार, कंट्रोलर, बॅटरी, इलेक्‍ट्रिक ऍक्‍सीलेटर इत्यादी साहित्य वापरण्यात आले आहे. इलेक्‍ट्रिक डिव्हाईसची चावी बंद केली की नेहमीप्रमाणे पॅडल मारून सायकल चालविता येते. बाजारातील सायकलिंगमध्ये 250 वॅटची मोटार असते, मात्र या डिव्हाईसमध्ये 350 वॅटची मोटार बसविलेली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
घरी करा बॅटरी चार्ज 
या डिव्हाईसची बॅटरी डिटॅचेबल असल्याने ती घरात नेऊन चार्ज करता येते. बाजारात मिळणाऱ्या सायकलींची बॅटरी इनबिल्ट असल्याने सायकल पार्किंगमध्येच पॉइंट काढून चार्ज करावी लागते. विशेषतः सदनिकांमध्ये राहणाऱ्या लोकांना पार्किंगमध्ये थेट सायकल चार्ज करण्यापेक्षा बॅटरी घरात नेऊन चार्ज करणे सोयीचे आहे. तसेच, बॅटरी चोरीला जाण्याचीही भीती राहत नाही. 

दोन प्रकारचे मॉडेल 
- 14 वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांसाठी ट्रॅव्हल 250 हे मॉडेल असून ही सायकल साधारण 40 किलोपर्यंत वजन पेलू शकते. 
- 14 वर्षांपुढील वयोगटासाठी ट्रॅव्हल 350 हे मॉडेल असून ही सायकल साधारण 80 किलोपर्यंत वजन पेलू शकते 

राजगुरुनगर येथील ओम मिसाळ या आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गेल्यावर्षी कमी खर्चात प्रायोगिक तत्त्वावर इलेक्‍ट्रिक सायकल तयार केली होती. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन हा उद्योग सुरू केल्याने, या सायकलला ओम ई-सायकल असे नाव दिले आहे. 
- संतोष कुलकर्णी 
 
माझ्या घरापासून माझ्या ऑफिसचे अंतर सुमारे 16 किलोमीटर आहे. रोज ऑफिसला जाण्यासाठी मला कंपनीच्या गाडीतून अथवा दुचाकीवरून जावे लागत असे. मागील महिन्यात जीएसके सर्व्हिसेस कंपनीने माझ्या सायकलला, बॅटरी आणि मोटर किट बसवून दिले. त्यामुळे आता मला रोज त्या सायकलवर ऑफिसला जाणे येणे सहज शक्‍य झाले आहे. त्यामुळे साधारणपणे माझा रोजचा 80 रुपयांचा खर्च वाचला. ऑफिसला जाता येताना चांगला व्यायामही घडत असल्यामुळे एकदम फ्रेश वाटत आहे,
- मोहित फडणीस, तळेगाव (ता. मावळ)  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make a simple bicycle electric in such a way