बदलत्या काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना कुशल बनवा : प्रतापराव पवार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

या पुढे फक्त नोकरीवर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि त्यासाठी संबंधित अभ्यासक्रम शिकवण्यावर भर द्यावा.

बारामती (पुणे) : शाळा-महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना बदलत्या काळाची गरज ओळखून तंत्रज्ञानामध्ये कुशल बनविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन 'सकाळ' माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले. 

विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात बारामती पंचक्रोशीतील विविध शिक्षण संस्थांच्या प्राचार्यांशी प्रतापराव पवार यांनी नुकताच संवाद साधला. त्या संवादादरम्यान त्यांनी ही गरज बोलून दाखवली. विद्या प्रतिष्ठान, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ आणि सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य या प्रसंगी उपस्थित होते. 

बारामतीत झालेल्या टी 20 सामन्यात शिरुरकडून पुण्याचा धुव्वा​

पवार म्हणाले, भविष्यात येणाऱ्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, इंडस्ट्री 4.0 यासारखे बदलते तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारी मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांनी नवनवीन अभ्यासक्रम अमलात आणून विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानामध्ये कौशल्यपूर्ण बनविणे गरजेचे आहे. 

या पुढे फक्त नोकरीवर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि त्यासाठी संबंधित अभ्यासक्रम शिकवण्यावर भर द्यावा. कोरोनामुळे आपल्याला जाणीव झालेल्या नव्या जीवनशैलीला स्विकारुन येणाऱ्या भविष्यातील संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य आणि ताकद विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक उपक्रमामार्फत दिले पाहिजे.

मानलं बुवा! 'आराम हराम है' म्हणत केंद्रीय मंत्र्यांचं 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल'!​

सकाळ समूहाच्या एज्युकॉन या उपक्रमाद्वारे गेल्या 20 वर्षांपासून विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि शिक्षण तज्ज्ञ, विविध उद्योगांचे प्रमुख एकत्र येऊन जगभरातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन नवनवीन शैक्षणिक पद्धती जाणून घेतात, तसेच या माध्यमातून मिळालेल्या माहिती आणि ज्ञानाचा उपयोग आपल्या देशातील  शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी केला जातो. 

या संवादासाठी विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ऍड. अशोक प्रभुणे, सचिव ऍड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त सुनेत्रा पवार, डॉ. राजीव शाह, मंदार सिकची, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, या प्रसंगी उपस्थित होते. सूत्रसंचालन  दिनेश झेंडे यांनी केले. प्राचार्य आर. एस. बिचकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make students skilled by recognizing the need of changing times says Prataprao Pawar