साडेसहा महिने झाले ओ, मुलीचं तोंड पाहिलं नाही; बायको अन् तिच्या घरचे भेटू देईना!

Man
Man

पुणे : ''कौटुंबिक न्यायालयात आमचा घटस्फोटाचा दावा सुरू आहे. आमच्या मुलीचा ताबा पत्नीकडे आहे. न्यायालयाने मला मुलीला भेटण्यास परवानगी दिली आहे. मात्र, पत्नी आणि तिच्या घरचे कोरोनाचे कारण सांगून मला मुलीला भेटू देत नाहीत. तर तिच्याशी बोलण्यासाठी व्हिडीओ कॉल केला, तर तो उचलला जात नाही. त्यामुळे कोरोना सुरू झाल्यापासून मला मुलीचे तोंड देखील पाहता आले नाही,'' अशी व्यथा तिच्या पालकांनी मांडली.

कोरोनाचा प्रसार वाढण्यापूर्वी पाच वर्षांच्या श्रेयाला तिचे वडील आशिष दर शनिवारी भेटत होते. मात्र, मुलीचा ताबा असलेले पालक आशिष यांना तिला कोरोनाचे कारण सांगून भेटू देत नाहीत. त्यामुळे कधी एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल आणि मुलीला भेटता येईल, अशी आस आशिष यांना लागली आहे. आशिष आणि त्यांची पत्नी श्रद्धा (सर्व नावे बदललेली) हे दोघेही आयटीमध्ये कामाला आहेत. गेल्या वर्षी त्यांनी घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यानच्या काळात मुलीला भेटता यावे म्हणून आशिष यांनी अर्ज केला होता. त्यावर ते दर शनिवारी दुपारी 11 ते दीड दरम्यान श्रेयाला तिच्या आईच्या घरी भेटू शकता, असा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र, कोरोनापासून ना ते मुलीला भेटू शकले ना त्यांना व्हिडिओ कॉलवर बोलू दिले.

भेटायला गेले तर पोलिसांत तक्रार केली :
श्रद्धा कामाला गेल्यानंतर त्यांचे आई-वडील श्रेयाचा सांभाळ करतात. भेटीबाबत वेळोवेळी कॉल करूनही प्रतिसाद न मिळाल्याने लॉकडाऊन काळात एक दिवस आशिष थेट पत्नीच्या घरी गेले. त्यावेळी त्यांना मुलीला भेटू दिले नाही. उलट आम्हाला त्रास दिला म्हणून श्रद्धा यांच्या वडिलांनी आशिष यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती, अशी माहिती आशिष यांचे वकील ऍड. झाकिर मणियार यांनी दिली.

माझी रात्रपाळी असते तर पत्नी नोकरीच्या निमित्ताने दिवसभर बाहेर असते. त्यामुळे श्रेयाचा ताबा तिच्या आजी-आजोबांकडे असतो. तिला भेटण्यासाठी गेलो असता ते अडवणूक करता. त्यामुळे पत्नीने माझी मुलीबरोबर भेट घालून द्यावी. कोरोनाविषयक आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेण्यास मी तयार आहे.
- आशिष

- कोरोनाचे कारण सांगून भेट टाळली जात आहे.
- व्हिडिओ कॉल किंवा कॉलवर बोलू दिले जात नाही.
- पत्नीच्या आई-वडिलांचा यात हस्तक्षेप
- पत्नीने आमची भेट घडवून देण्याची पतीची मागणी
- कोरोना विषयक खबरदारी घेऊन भेटण्याची वडिलांची तयारी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com