लेफ्टनंट कर्नल असल्याची बतावणी करणाऱ्याला पुण्यात अटक; मोठ्या रॅकेटची शक्यता

निलेश बोरुडे
Wednesday, 11 November 2020

लेफ्टनंट कर्नल असल्याचे दाखवून एक व्यक्ती अनेक ठिकाणी फिरत असल्याची, अनेकांना फसवत असल्याची असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्यांमार्फत मिळाली होती.

पुणे - लष्करामध्ये लेफ्टनंट कर्नल या पदावर असल्याचे दाखवून तब्बल एक वर्षापासून किरकटवाडी येथे राहत असलेल्या एका तरुणाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून ताब्यात घेतले आहे. तपासामध्ये हाती लागलेल्या कागदपत्रांवरून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंकित कुमार सिंह (वय 23 सध्या राहणार उत्सव सोसायटी किरकटवाडी, मूळ राहणार इलाहाबाद ,उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तोतया अधिकार्‍याचे नाव आहे. त्याच्याकडून दहा वेगवेगळ्या प्रकारची ओळखपत्रे, आठ एटीएम कार्ड, एक लॅपटॉप, एक टॅब, कलर प्रिंटर, एडीट केलेले लेफ्टनंट कर्नल पोशाखातील फोटो, विमानाची तिकिटे, वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट, पेन ड्राईव्ह, दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लष्करी अधिकारी असल्याचे भासवून संबंधित व्यक्तीने अनेकांना फसवले असण्याची शक्यता आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

लेफ्टनंट कर्नल असल्याचे दाखवून एक व्यक्ती अनेक ठिकाणी फिरत असल्याची, अनेकांना फसवत असल्याची असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्यांमार्फत मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश भगत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेडगे, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खडके, पोलीस नाईक काशिनाथ राजापुरे, पोलीस कॉन्स्टेबल सुनिता माने यांनी तोतया लष्करी अधिकारी म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपी अंकित कुमार सिंह यास हवेली पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

तीन महिन्यांपासून होमगार्ड जवान पगाराविना; आता दिवाळी तरी गोड होणार का?​

लष्कराच्या गुप्तहेर विभागाची मदत
सदर कारवाई मध्ये भारतीय लष्कराच्या गुप्तहेर विभागाची स्थानिक गुन्हे शाखेला मदत झाली. कारवाईदरम्यान लष्कराच्या गुप्तहेर विभागातील तीन अधिकारी दोन दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला सहकार्य करत होते. लष्कराकडूनही याबाबत गांभीर्याने तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man who say he is Lieutenant colonial arrested in pune