उसाच्या शेतात बिबट्याची चार पिल्ले आढळून आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard Calf

अवसरी खुर्द येथील शेतकरी उत्तम सावळेराम शिंदे यांच्या उसाच्या पिकात बिबट्याची चार पिल्ले आढळून आली.

Manchar Leopard : उसाच्या शेतात बिबट्याची चार पिल्ले आढळून आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण

मंचर - अवसरी खुर्द मुळेवाडी मार्गे मंचर (ता. आंबेगाव) या रस्त्याने अवसरी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जात असताना बुधवारी (ता. 15) शेतकरी उत्तम सावळेराम शिंदे यांच्या उसाच्या पिकात बिबट्याची चार पिल्ले आढळून आली. उसाची तोडणी सुरू असताना ऊसतोडनी कामगारांना बिबट्याची पिल्ले दिसली. त्यामुळे ऊसतोड कामगारांनी क्षणाचाही विलंब न लावताभीती पोटी तेथून धूम ठोकली.

या परिसरात शासकीय अभियांत्रिकी व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. परिसरातच अनेक खाजगी वसतीग्रह व सरकारी वस्तीगृहात जवळपास दीड हजार विद्यार्थी मुक्कामी असतात. पण बिबट्या मादी व पिल्लांचा वावर असल्याची माहिती समजल्यानंतर आज रात्री महाविद्यालय परिसरातील रस्त्यांवर शुक शुकाट होता.

मंचर शहरातील अनेक नागरिक व महिला संध्याकाळी व पहाटे या भागात फिरायला येतात. त्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष भोर यांनी या भागात फिरून केले. तसेच वन खात्याने पिंजरा लावून बिबट मादीला व पिल्लांना सुरक्षित स्थळी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलवावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

मंचर मुळेवाडीमार्गे अवसरी शासकीय रस्ता लगत मुधारा डोंगरालगत उत्तम सावळेराम शिंदे यांची भीमाशंकर सहकारी साखर करखाण्याच्या वतीने ऊसतोड चालू असताना कामगारांना बुधवारी दुपारी बिबट्याची 4 पिल्ले दिसल्याने ऊसतोड कामगारांनी ऊसतोड थांबवली आहे. स्थानिक नागरिकांना व भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक आनंदराव शिंदे यांनी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे .

दरम्यान मंचर वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस व वनपाल संभाजीराव गायकवाड यांनी या भागात गस्त व जनजागृतीचे काम हाती घेतले असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी. तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याबाबतही कार्यवाही करण्याचे काम वन खात्याने सुरू केले आहे. असे वन खात्याकडून सांगण्यात आले.