मंचर नगरपंचायत श्रेयासाठी राजकारण्यांची चढाओढ

डी. के. वळसे पाटील
Friday, 4 December 2020

होणाऱ्या नगर पंचायतीचे श्रेय घेण्यासाठी सध्या चढाओढ सुरू आहे. राजकारण्यांची श्रेयाची जोरदार लढाई सोशल मिडियातूनही पहावयास मिळत आहे.

मंचर : दहा वर्षापासून प्रलंबित असलेली मंचर नगर पंचायत मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहे. येत्या तीन-चार दिवसात राज्य शासनाकडून आधिसुचना निघण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनीही अनुकुलता दर्शविली आहे. होणाऱ्या नगर पंचायतीचे श्रेय घेण्यासाठी सध्या चढाओढ सुरू आहे. राजकारण्यांची श्रेयाची जोरदार लढाई सोशल मिडियातूनही पहावयास मिळत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंचर शहराने ९० हजार लोकसंख्येचा टप्पा ओलांडला आहे .नागरी सुविधासाठी नगरपंचायतीची मागणी  केली जात आहे. मंचर ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट असून निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.या पार्शवभूमीवर नगरपंचायतीच्या मागणीचा जोर वाढला आहे. 

खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला कचऱ्याचे ढीग; व्यावसायिकांकडून होतेय विद्रुपीकरण

शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील ,पुणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर ,माजी सरपंच दत्ता गांजाळे, उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले यांनी नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे व नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांची भेट घेऊन प्रस्तावातील त्रुटी दूर करून नगर पंचायत स्थापन करण्यासाठी पाठपुरावा केला. “प्रस्तावावर शिंदे यांची स्वाक्षरी झाली असून मुंबई येथे पत्रकार परिषदेत मंचर नगर पंचायतीची घोषणा शिंदे करणार आहेत.”असे आढळराव पाटील यांनी जाहीर केले आहे.

महाविकास आघाडीतील भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले(शिवसेना), कॉंग्रेस पक्षाचे आंबेगावचे अध्यक्ष राजू इनामदार, संतोष गावडे, अल्लू इनामदार, लक्ष्मण थोरात भक्ते, सुहास बाणखेले, जे.के थोरात,  राजेंद्र थोरात या नेत्यांनी गुरुवारी (ता.३) विधान भवन येथे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन “हम भी कुछ कम नही” असा संदेश देऊन नगरपंचायतीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मान्यवरांनी सकारात्मकता दाखवून आचारसंहिता संपल्यानंतर नगर पंचायतीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे जाहीर केले. श्रेयाच्या चढाओढीत मात्र मंचरकरांचा फायदाच होणार असून येत्या चार-पाच दिवसात नगरपंचायतीची आधिसुचना निघणार आहे. श्रेयासाठी नेत्यांची सुरु असलेल्या धावपळीची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

सुरक्षा व्यवस्थेचा गराडा पार करून, नमस्कार घालून “मी राजाराम बाणखेले” असे सांगताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाणखेले यांच्यावर कटाक्ष टाकत “आंबेगाव मध्ये कशी परिस्थिती आहे.”अशी  आस्थेवाईकपणे चौकशी केल्यानंतर बाणखेले यांच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू पाहून उपस्थित कार्यकर्तेही भारावून गेले. बाणखेले म्हणाले,“माझ्या सारख्या सामन्य कार्यकर्त्याची मुख्यमंत्री साहेबांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली हा माझ्या जीवनातील आनंदाचा सर्वोच्च क्षण आहे.”

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manchar Nagar Panchayat starts politics for credit