नगरच्या शिवसेनेचा ढाण्या वाघ होता अवसरीकरांच्या ह्रदयातील अनिलभैय्या

सुदाम बिडकर
Thursday, 6 August 2020

शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री व नगर जिल्ह्याचे शिवसेना नेते अनिल राठोड यांच्या अकाली निधनाने त्यांचे मूळ गाव असलेल्या पुणे जिल्ह्यातील अवसरी खुर्द या गावी शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.

पारगाव (पुणे) : शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री व नगर जिल्ह्याचे शिवसेना नेते अनिल राठोड यांच्या अकाली निधनाने त्यांचे मूळ गाव असलेल्या पुणे जिल्ह्यातील अवसरी खुर्द या गावी शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अनेक आठवणी ग्रामस्थ बोलून दाखवत आहे. त्यांच्या निधनाबद्दल गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. 

प्रत्येक बारामतीकराची आजपासून होणार तयारी

राजपूत समाजाचे राठोड कुटुंबिय मूळचे राजस्थानचे. अनिल राठोड यांचे पूर्वज आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे स्थायिक झाले होते. कालांतराने राठोड यांचे वडील व्यवसायानिमित्त नगरला स्थायिक झाले. त्यांच्या एका चुलत्याचे कुटुंब अवसरी खुर्द येथे आहे. अनिल राठोड यांचा जुना वाडा अवसरीच्या बाजारपेठेमध्ये खालच्या वेशीला होता. त्यांची शेतीही अवसरी खुर्दमध्ये आहे. त्यांचा वाडा जुन्या पध्दतीचा देखणा हो.ता त्यामध्ये एका चित्रपटाचे चित्रीकरणही झाले आहे. शिवसेना शाखेच्या अनेक बैठका याच वाड्यात होत होत्या. 

न्यायालयात केवळ तत्काळ प्रकरणांवर सुनवाई

अनिल राठोड यांचा नगर शहरातील व्यवसायात जम बसल्यानंतर त्यांच्यातील कार्यकर्ता शांत बसला नाही. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे सुरू केले. हिंदू एकता आंदोलनाची शाखा नगरला सुरू झाल्यानंतर ते संघटनेचे काम करू लागले. शिवसेनेने त्यांच्यावर थेट नगर शहरप्रमुखपदाची जबाबदारी टाकली. तेव्हापासून ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. ते शिवसेनेच्या तिकीटावर पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी युती शासनाच्या काळात अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. ते नगरमध्ये जरी स्थायिक झाले असले, तरी त्यांची नाळ मूळ गाव असलेल्या अवसरी खुर्दशी जुळलेली होती. ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेला दरवर्षी ते आवर्जून उपस्थित राहत. एकाद्या वर्षी यात्रेला येता नाही आले, तर ते कुटुंबासह कधीतरी येऊन देवाचे दर्शन घेऊन जात. त्यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अवसरी खुर्द ग्रामस्थांनी त्यांचा नागरी सत्कार करून गावातून मिरवणूक काढली होती.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अनिल राठोड यांचे विश्वासू समजले जाणारे शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर त्यांच्याबाबत बोलताना म्हणाले की, अवसरी खुर्द येथील भैरवनाथ मंदिरात चांदीचा गाभारा करण्याची भैय्यांची इच्छा होती. त्यासाठी ग्रामस्थांना नगर येथील एका मंदिरातील चांदीची कलाकृती पहाण्यासाठी बोलविले होते. नंतर गाभारा बनविणाऱ्या कलाकाराला घेऊन भैय्या स्वतः अवसरीला आले होते. राज्यमंत्री असताना अवसरी खुर्दमधील काही बंधारे मंजूर करण्यास मदत केली प्राथमिक आरोग्य उपकेंद्र भूमिपूजन व अवसरीतील आयुर्वेदिक दवाखान्याचे उदघाटन भैय्यांच्या हस्ते झाले होते. अवसरीतील कोणालाही नगर शहरात काही अडचण आल्यास भैया स्वतः त्या ठिकाणी जाऊन ती सोडवत होते. 

अनिल राठोड यांचे चुलत बंधू व अवसरी खुर्द ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजू राठोड यांनी सांगितले की, अनिल भैय्या आमच्या राठोड परिवाराचे भूषण होते. आमच्या कौटुंबिक कार्यक्रमात ते आवर्जून उपस्थित राहत. ते जरी नगरमध्ये स्थायिक झाले असले, तरी घरात एखादे शुभकार्य निघाल्यावर ते पहिली पत्रिका भैरवनाथाच्या चरणी ठेवण्यासाठी आठवणीने यायचे. भैयाच्या निधनाची बातमी कळल्यानंतर आमच्या कुटुंबावर दुखाची कुऱ्हाड कोसळली. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आम्हाला अंत्यसंस्काराला जाता आले नाही. भैयाचे अंतिम दर्शन घेता आले नसल्याची खंत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many memories of Anil Rathod told by Avsari villagers