पोलिसांमध्ये दडलेला कलाकार जागा झाला पाहिजे : नागराज मंजुळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

पोलिस आपल्या जिवाची पर्वा न करता वेगवेगळ्या अंगाने गुन्हे उघडकीस आणतात, त्यांचे हेच जगणे मी एका लघुपटाद्वारे प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.

पुणे : ''पोलिस अकार्यक्षम असल्याचे बोलले जाते; परंतु समाज म्हणून आपण आपली जबाबदारी पाळतो का, पोलिस रात्रंदिवस आपल्या सुरक्षेसाठी तैनात असतात, त्यांचे अनुभव पुस्तकरूपात येणे महत्त्वाचे होते. पोलिसांमध्ये दडलेला कवी, लेखक, कलाकार जागा झाला पाहिजे,'' असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. 

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये विश्वकर्मा पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित व पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या संकल्पातून साकारलेल्या 'पोलिस फाइल्स' या पुस्तकाचे प्रकाशन मंजुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी पोलिस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर, डॉ. वेंकटेशम, अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, विश्वकर्मा ग्रुपचे अध्यक्ष राजकुमार अगरवाल, विश्‍वस्त ऍड. प्रताप परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी व पुस्तकाच्या समन्वयिका विदुला टोकेकर उपस्थित होत्या. 

''वर्दीतल्या कठोर पोलिसांतही एक संवेदनशील माणूस असतो, तो माणूस 'पोलिस फाइल्स' या पुस्तकामधून व्यक्त झाला आहे,'' असे सांगून मंजुळे म्हणाले, ''पोलिस आपल्या जिवाची पर्वा न करता वेगवेगळ्या अंगाने गुन्हे उघडकीस आणतात, त्यांचे हेच जगणे मी एका लघुपटाद्वारे प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.'' 

''पोलिस प्रज्ञाशील असतात. विविध परिस्थितीत गुन्ह्यांचा उलगडा करतात. त्यांच्या कुशलतेला शब्दबद्ध करून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तपासादरम्यान पोलिसांना वेगवेगळे अनुभव येतात. हे अनुभव पुस्तकरूपात आल्यामुळे आता पोलिस अधिकारी व कर्मचारी आपले अनुभव कथेत मांडतील,'' असे डॉ. वेंकटेशम यांनी सांगितले. 

कुलकर्णी म्हणाले, ''या पोलिस कथांमधून इतर पोलिस अधिकारी लिहिते होतील. पोलिसांसंबंधित संशोधनात आपण योगदान द्यावे. त्यासाठी विविध संस्थांबरोबर सामंजस्य करार करत आहोत.'' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष घुले यांनी केले. आभार डॉ. रवींद्र शिसवे यांनी मानले. 

पोलिसांबाबत जनतेने विश्वास दाखवला तर आणखी जोमाने काम करता येईल. पोलिसांनी बोलते व्हायला हवे. पोलिस बोलत नाहीत, याचा अर्थ त्यांना भावना नाहीत असे नाही. 
- डॉ. मीरा बोरवणकर, माजी पोलिस महासंचालक 

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Vidhan Sabha 2019 : प्रणिती शिंदे यांच्याकडून आचारसंहिता भंग? (व्हिडिओ)

- 'हाउडी, मोदी' कार्यक्रम होणारच; तयारी अंतिम टप्प्यात

- अपना टाईम आ गया; 'गली बॉय' निघाला ऑस्करला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi film director Nagraj Manjule comment about the artist hidden in Police person