तमाशाचा फड रंगणार;सरकारच्या परवानगीनंतर बेमुदत उपोषण मागे

marathi lok kalawant hunger strike
marathi lok kalawant hunger strike

पुणे - कोरोनामुळे बंद करण्यात आलेले लोककलांचे कार्यक्रम आता पुन्हा सुरु होणा आहेत. कार्यक्रम बंद असल्यानं कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती. यामुळे कार्यक्रमांना परवानगी द्यावी यासाठी मराठी लोककलावंत तमाशा परिषदेनं बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलं होतं. आता राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने तमाशा लोककलांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारी सायंकाळी लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर मराठी लोककलावंत तमाशा परिषदेने बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. त्यामुळे आता तमाशाचा फड रंगणार आहे. 

राज्य सरकारने सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी दिली; परंतु लोकनाट्य तमाशाला परवानगी न दिल्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने तमाशाला परवानगी द्यावी, यासाठी अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्याने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. 

सरकारच्यावतीने लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा तमाशा परिषदेचे अध्यक्ष अविष्कार मुळे आणि कार्याध्यक्ष संभाजीराजे जाधव यांनी दिला होता. दरम्यान, सरकारने लेखी आश्‍वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे. परंतु परिषदेच्या इतर मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी जाधव यांनी केली. 

लोककला अनुदान पॅकेजनुसार लोकनाट्य तमाशा मंडळाला कायमस्वरूपी अनुदान पॅकेज देण्यात यावे. जिल्हा पोलिस प्रमुखांकडून ध्वनीवर्धकाचा परवाना विनाअट मिळावा. राज्य सरकारकडून जिल्हा वृद्ध मानधन कमिटीमध्ये त्याच कला प्रकारातील ज्येष्ठांना संधी द्यावी. राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या समित्यांमध्ये तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंतांची निवड व्हावी अशा मागण्याही करण्यात आल्या.

कोरोनामुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे प्रत्येक कलावंतास पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी. तसेच, लोककलावंतांच्या उन्नतीसाठी तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर लोककला आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशा मागण्या तमाशा परिषदेच्यावतीने करण्यात आल्या आहेत. परिषदेचे अध्यक्ष अविष्कार मुळे, कार्याध्यक्ष संभाजीराजे जाधव, सचिव मोहित नारायणगांवकर, उपाध्यक्ष शेषराव गोपाळ, मयूर महाजन, सुनील वाडेकर, हसन शेख पाडेवाडीकर यांच्यासह इतर लोककलावंत बेमुदत उपोषणात सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com