सेंद्रीय शेती, पूरक धंद्यांमध्ये मोठी वाढ आवश्यक- पंतप्रधान मोदी

जनार्दन दांडगे
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

बायफ संस्थेच्या सुवर्णमोहत्सवी वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या उरुळी कांचन येथील कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उरुळी कांचन - कृषिक्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आणावयाचा असेल तर सेंद्रीय शेती व शेतीपूरक जोडधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणे गरजेचे आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.  उरुळी कांचन (ता. हवेली) येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या (बायफ) सुवर्ण मोहत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलताना मोदींनी वरील मत व्यक्त केले.

बायफ संस्थेच्या सुवर्णमोहत्सवी वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या उरुळी कांचन येथील कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे होते. 

यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, माजी आमदार अशोक पवार, महाराष्ट्र राज्य आदर्श गाव कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक पोपटराव पवार, बायफ ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मफतलाल, संस्थेचे अध्यक्ष गिरीश सोहनी, वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अशोक पांडे, विश्वस्त प्रतापराव पवार, विश्वस्त डॉ. एन. जी. हेगडे, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत उपस्थित होते. यावेळी आधुनिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी, उत्कृष्ठ डेअरी व्यावसायिक, आदर्श महिला बचत गट, आदर्श व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. 

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "बायफ संस्थेच्या माध्यमातून शेती विकास, दुग्धविकास व आदिवासी विकास यांसारखी विकास कामे देशातील सुमारे १६ राज्यांमध्ये काम सुरु आहेत. यापुढील पर्वामध्ये संस्थेने पुढाकार घेवून देशाच्या उत्तर व पूर्व भागातील आठ राज्यांमध्ये देखील संस्था स्थापन करून संपूर्ण देशामध्ये आपल्या कामाचा विस्तार वाढवावा. प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी संस्थेने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. देशामध्ये शेती व शेतीपूरक व्यवसायात सुमारे ७० टक्के महिलांचा सहभाग असतो. त्यामुळे महिलांना प्रशिक्षित करून व्यवसायात वृद्धी होण्यासाठी महिलांना बायफसारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. शेतीमधून मोठा आर्थिक नफा मिळविण्यासाठी रासायनिक खातांना फाटा देवून सेंद्रिय शेती व सेंद्रिय औषधांचा वापर वाढविणे महत्वाचे आहे. देशामध्ये हरितक्रांती, धवलक्रांती, जलक्रांती याचप्रमाणे यापुढील काळात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नफा मिळविण्यासाठी रेशीम व मध क्रांती होणे काळाची गरज आहे." यावेळी या भाषणादरम्यान मोदी यांनी बायफ संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई यांची विशेष प्रशंसा केली. 

यावेळी बोलताना प्रकाश जावडेकर म्हणाले, "बायफ संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेला शेती विकास, दुग्धव्यवसाय व अदिवासी विकास यांच्यासारखे विविध कामे उल्लेखनीय आहेत. जागतिक उत्पन्नाच्या पटीत देशाची कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता निम्म्यावर आहे. शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी शेतीचे माती परीक्षण, ठिबक सिंचन, जलसंवर्धन, पिक विमा व मुख्य बाजारपेठ उपलब्ध होणे महत्वाचे आहे. देशाला पुनरुज्जीवित करण्यासाठी शेती, औद्यागिक, शिक्षण व इतर क्षेत्रातील सर्वांनी एकत्रित येवून प्रयत्न करावेत. देशाच्या विकासासाठी ग्रामीण भागांचा विकास महत्वाचा आहे. बायफ संस्थेच्या माध्यमातून देशातील सुमारे एक लाख खेड्यांमध्ये संकरीत गोपैदास, सुधारित शेती व शेती पूरक व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचे सुरु असलेले काम कौतुकास्पद आहे." 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पोलिसानेच हिसकावले भिकाऱ्याचे पैसे
गणेशाची व्रते 
उत्तर प्रदेशात गर्भवती महिलेला तोंडी तलाक
शिक्षण सोडून 'तो' बनला दहशतवादी
खासगीपणाच्या हक्काला आधार (अग्रलेख)
महिलांकडून परिवर्तनाचा ‘श्रीगणेशा’
बाप्पा... लौकर या! (ढिंग टांग!)
शांतता सुळावर? 
ध्वनिक्षेपक वापरात गणपतीत चार दिवस सूट 

Web Title: marathi news pm narendra modi emphasis organic farming