esakal | पुण्यात कांद्यानं पार केली शंभरी; जुन्या कांद्याला मोठी मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

market yard onion rates crossed hundred rupees

बाजारात खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातून जुन्या कांद्याची आवक होत आहे. तर श्रीगोंदा आणि संगमनेर परिसरातून नवीन कांद्याची अत्याल्प आवक होत आहे.

पुण्यात कांद्यानं पार केली शंभरी; जुन्या कांद्याला मोठी मागणी

sakal_logo
By
प्रवीण डोके

मार्केट यार्ड : रोजच्या जेवणातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या कांद्याने भाव खाल्ला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढत आहेत. सोमवारी घाऊक बाजारात दहा किलो कांद्याचे दर 550 तर 620 होते. मंगळवारी (ता. 20) यामध्ये वाढ होऊन जुन्या कांद्याचे दर 750 ते 850 रुपयांवर गेले आहेत. तर, किरकोळ बाजारात 110 ते 120 रुपये किलोने विकला जात आहे.

आणखी वाचा - कांद्याचा मंचरला मिळाला, 120 रुपये दर

बाजारात खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातून जुन्या कांद्याची आवक होत आहे. तर श्रीगोंदा आणि संगमनेर परिसरातून नवीन कांद्याची अत्याल्प आवक होत आहे. मार्केट यार्डातील कांदा विभागात मंगळवारी 70 ट्रक कांद्याची आवक होत आहे. सध्या शहरातील हॉटेल, खानावळी, विविध खाद्यपदार्थ विक्री केंद्र सुरू झाली आहेत. त्यामुळे कांद्याला मागणी वाढत आहे. दक्षिण भारतातून केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातूनही जुन्या कांद्याला मागणी वाढत आहे. त्यामुळे  कांद्याचे दर वाढत चालले असल्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

आणखी वाचा - मुंबई पाठोपाठ पुण्यात मेट्रो कारशेडचा प्रश्न मार्गी 

केंद्र सरकारने कांद्याचे दर आवाक्यात राहावे यासाठी निर्यात बंदी घातली आहे. परंतु, पावसाने कांद्याचे नुकसान झाले आहे. बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी होत आहे. तसेच मागील काही दिवसात झालेल्या सततच्या पावसाने कांद्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर नवीन कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये वाढ होत असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी गणेश यादव यांनी दिली.

महाराष्ट्रात कांद्याचा तुटवडा
कांदा हा रोजच्या जेवणातील महत्त्वाचा पदार्थ आहे. परंतु, पावसामुळे कांद्याचे उत्पन्न कमी झाले आहे. तर, दक्षिणेकडील राज्यांकडून मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. सध्या घाऊक बाजारात कांद्याचे दर सतत वाढत आहेत. तर, किरकोळ बाजारातही दरवाढ होत आहे.