वीर जवान अमर रहे! सुभेदार लक्ष्मण डोईफोडे अनंतात विलीन!

Subhedar_Laxman_Doiphode
Subhedar_Laxman_Doiphode

वालचंदनगर (पुणे) : भारत माता की जय... वंदे मातरम्... लक्ष्मण डोईफोडे अमर रहे... वीर जवान अमर रहे...च्या घोषणा देत इंदापूर तालुक्यातील बोराटवाडीमध्ये शहीद जवान सुभेदार लक्ष्मण सतू डोईफाेडे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभेदार लक्ष्मण डोईफोडे हे आसाम मधील सिग्नल रेजिमेंट मध्ये सुभेदार पदावर कार्यरत होते.  २३ फेब्रुवारी रोजी ड्युटीवरती असताना भारतीय जवानांची गाडी दरीमध्ये कोसळली होती. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवार (ता.२६) रोजी सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांचे पार्थिव आर्मीच्या गाडीमधून बोराटवाडी गावी आणण्यात आले. यावेळी नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम्, लक्ष्मण डोईफोडे अमर रहे, वीर जवान अमर रहेच्या घाेषणांनी परिसर दुमदुमला होता. गावकऱ्यांनी घरासमोर रांगोळ्या काढून श्रद्धांजली वाहिली.

बोराटवाडी गावच्या चौकापासून अंत्ययात्रेला सुरवात झाली. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर-ट्राॅलीमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. इंदापूर आणि माळशिरस तालुक्यातील नागरिकांनी अंत्ययात्रेसाठी गर्दी केली होती. शेतामधील घरी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आर्मीचे जवान आणि पाेलिसांनी हवेत फैरी झाडून मानवंदना दिल्यानंतर शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्ययात्रेला राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे, सरपंच दत्तू सवासे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.

यावेळी भरणे यांनी सांगितले की, सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांच्या कुंटुबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार असून शासनाची जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वांना दु:ख झाले असल्याचे सांगितले. अखेरचा निरोप देत असताना नागरिकांचे डोळे पानावले होते. साश्रू नयनांनी लक्ष्मण डोईफोडे यांना अखेरचा निराेप दिला.

२६ वर्ष देशसेवेसाठी अपर्ण करणारा अवलिया
सुभेदार लक्ष्मण डोईफोडे हे १९व्या वर्षी भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाले होते. गेल्या २६ वर्षापासून ते देशाची सेवा करीत होते. त्यांनी आत्तापर्यंत तीन वेळा सेवा वाढवून घेऊन देशाची सेवा करीत होते. ते काही दिवसापूर्वी त्यांच्या मूळ गावी आले होते. त्यांची एक वर्ष नोकरी राहिली होती. देशसेवेनंतर आई-वडिलांची सेवा करण्यासाठी एक वर्षाने परत येणार असल्याचे जाताना सांगितले. मात्र काळाने त्यांच्या घाला घातल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मुलाचा अभिमान असल्याचे वडील सतू डोईफोडे यांनी सांगितले.

कुटुंबाचा टाहो हृदयाचे ठोका चुकविणारे...
सुभेदार लक्ष्मण डोईफोडे काही दिवसांपूर्वीच सुट्टीवरती आले होते. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावरती मोठा आघात झाला आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबाचे छत्र हरपले असून कुटुंबाचे अश्रू हृदयाचा ठोका चुकविणारे होते. त्यांच्या पाठीमागे आई छबुताई, वडील सतू, भाऊ चंदू, पत्नी सरिता, मुलगा चेतन (२० वर्षे) आणि मुलगी वैष्णवी (१२ वर्षे) असा परिवार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com