‘अहो, मास्क घाला, गळ्यात कशाला अडकवलाय? पीएमपी कंडक्टरांची वाढली डोकेदुखी

चाकण (ता. खेड) - पुणे-राजगुरुनगर मार्गावरील बसमधील प्रवासी.
चाकण (ता. खेड) - पुणे-राजगुरुनगर मार्गावरील बसमधील प्रवासी.

पुणे - ‘अहो, मास्क घाला, तो गळ्यात कशाला अडकवलाय?, मावशी मास्क नीट करा, अहो काका मास्क नाकावर घ्या, अशा सूचना प्रवाशांना द्याव्या लागत असल्याने पीएमपीचे वाहक पुरते वैतागले आहे. त्यात मास्क न घातलेला प्रवासी बसमध्ये घेतल्याचे आढळल्यास ‘मेमो’ मिळतो. प्रवासीसंख्या जास्त असल्यास पुन्हा कारवाईला सामोरे जावे लागते, ते वेगळेच. शाळेत मुलांना परत परत समजावून सांगावे लागते तसे प्रवाशांना सांगावे लागत असल्याची भावना एका वाहकाने व्यक्त केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोकडाउननंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातही पीएमपीची सेवा सुरू झाली आहे. एकूण ६०० बस रस्त्यावर आल्या आहेत. मात्र, पीएमपी सेवेसाठी अनेक नियम प्रशासनाने घातले आहे. एका बाजूला त्यांचे काटेकोर पालन करायचे, दुसऱ्या बाजूला प्रवाशांना समजावण्यात वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. यातून प्रवाशांबरोबर वादही होत आहेत. काही प्रवासी नावालाच मास्क घालतात. तो ना धड नाकावर, ना धड तोंडावर असतो. दोन सीटपैकी एकाच सीटवर प्रवाशाने बसायचे व दुसरे सीट रिकामे ठेवायचे, असा नियम असताना दोन्हीही सीटवर प्रवासी बसलेले दिसतात. मग वाहकाला एकाला उठवावे लागते. येथेच सुरू होतो वाद. 

मावशी म्हणते; उतरणार नाही
स्वारगेट बसस्थानकावर नुकताच घडलेला एक किस्सा. कोंढवा-शिवाजीनगर बसमध्ये प्रवासी चढले. वाहकाने मोजल्यानंतर एक प्रवासी जास्त होता. सगळ्यात शेवटी बसमध्ये चढलेल्या मावशीला वाहकाने खाली उतरायला सांगितले. त्या उतरायला तयारच नाहीत. त्यांचं म्हणणं, मी एकटीनेच का उतरायचं, बसमध्ये उभ्या असलेल्या सर्व प्रवाशांना खाली उतरवा, मगच मी खाली उतरेन. वाहक तिला समजावून थकला. पण मावशी ऐकायला तयार नाहीत. शेवटी ‘‘बस पोलिस ठाण्याला घ्या’’, असे वाहकाने म्हणताच मावशी शिव्या देत खाली उतरल्या आणि बसने स्वारगेट बसस्टॉप सोडला. ‘नुसती वैतागवाडी’, वाहकाने प्रतिक्रिया व्यक्त करून तिकीट द्यायला सुरवात केली.

पोलिसांचीही बसमध्ये नजर
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलिसांची बसमधील प्रवाशांवरही नजर असते. कोणी विनामास्क असल्यास बस थांबवून प्रवाशाकडून दंड आकारला जातो. पीएमपीच्या चालक-वाहकालाही बोलणी खावी लागतात. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांपैकी एक-दोन पोलिस पीएमपीवर नजर ठेवून असतात.

नियम असा आहे
- मोठ्या वा मिनी बसमध्ये प्रवासीसंख्या ५० टक्के
- एका सीटवर प्रवासी, बाजूचे सीट रिकामे
- प्रवाशांना मास्क हवाच
- दहा वर्षांच्या आतील मुलांना मनाई
- ज्येष्ठ नागरिकांना परवानगी दिली आहे

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना चालक-वाहकांना दिल्या आहेत. बसमधील गर्दी किंवा विनामास्क प्रवाशांसंबंधी तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाते.
- दत्तात्रेय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक

पुणे, भोसरी, चाकण, राजगुरुनगर मार्गावर बससेवा सुरू झाली आहे. एका सीटवर एक प्रवासी बसत आहे. गर्दी होईल असे प्रवासी बसविले जात नाहीत. 
- अमीर खंडागळे, वाहक

प्रवाशांना समजावून डोकं बधिर होतं. काही जण वादही घालतात. प्रवाशांच्या अडचणी समजतात. पण, शेवटी नियमांचे पालन करायचे आमच्यावरही बंधन आहे. 
- एक त्रस्त वाहक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com