'एमबीबीएस'च्या परीक्षेचं होतं टेन्शन; वडिलांसोबत गणपती दर्शनाला गेला अन् तिथून पळला!

MBBS_Student
MBBS_Student

पुणे : अभ्यास पूर्ण झाला नाही म्हणून टेन्शनमध्ये असलेल्या मुलाला भेटण्यासाठी त्याचे वडील मुंबईहून पुण्यात आले. मुलाला बरे वाटावे म्हणून ते त्याला गणेश दर्शनाला घेऊन गेले. मात्र, अभ्यास न झाल्याने आता आपले काय होणार या भीतीने त्याने वडिलांपासून पळ काढला. मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने वडिलांनी पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी केवळ सीसीटीव्हीच्या मदतीने त्याचा शोध घेतला.

मूळचा मुंबईचा असलेला 24 वर्षीय आदेश (नाव बदललेले) बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तो हॉस्टेलमध्येच राहतो. त्याची या महिन्यात परीक्षा सुरू होणार आहे. मात्र त्याचा अभ्यास पूर्ण झाला नव्हता. त्याचे त्याला टेन्शन आले होते. दरम्यान, त्याचे वडील मुंबईवरून त्याला भेटण्यासाठी आले होते. 30 ऑगस्टला हे दोघे दुपारी भेटले. त्यानंतर ते गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडले. दर्शन घेत असतानाच आदेश हा वडिलांना सोडून पळून गेला. वडिलांनी त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण तो लागला नाही.

त्यामुळे त्यांनी तत्काळ फरासखाना पोलिसांकडे धाव घेत हरविल्याची तक्रार दिली. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले. दरम्यान संगमब्रीजजवळ त्याचा मोबाईल मिळाला. त्यामुळे पोलिसांनी अग्निशमन व इतरांच्या मदतीने काही तास या नदीपात्रात शोध घेतला. पण तो मिळाला नाही. त्यामुळे पोलिस कर्मचारी सयाजी चव्हाण आणि आकाश वाल्मीकी या दोघांनी पुढचे सीसीटीव्ही पाहिले असता तो बोपोडीकडे जाताना दिसून आला.

सीसीटीव्हीद्वारे माग काढत त्याला लोणावळा येथून ताब्यात घेत पोलिसांनी वडिलांच्या हवाली केले. पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी, सचिन सरपाले, बापू खुटवड, गणेश आटोळे, दिनेश भांदुर्गे, मोहन दळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com