इंदापूर तालुक्याचा पाणीप्रश्न लवकरच मार्गी लागणार; मंत्रिमंडळ बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 August 2020

उजनी जलाशयातील पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे शेटफळगढे येथील तलावात खडकवासला कालव्याद्वारे इंदापूर तालुक्यातील लाभ क्षेत्रासाठी पाणी देण्यात येणार आहे.

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी आग्रही आहे. प्रस्तावित योजना, नीरा डावा कालवा आणि खडकवासला कालव्याची वहन क्षमता वाढविणे तसेच नीरा आणि भीमा नदीवरील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीची बैठक घेऊन कामे तातडीने मार्गी लावणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्‍न आणि टाटा धरणातील १० टीएमसी पाण्याच्या प्रश्‍नासाठी बुधवारी (ता.२६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

दौंड तालुक्यात मुगाला मिळाला 'इतका' बाजारभाव; चार तालुक्यांतून आवक सुरू​

उजनी जलाशयातील पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे शेटफळगढे येथील तलावात खडकवासला कालव्याद्वारे इंदापूर तालुक्यातील लाभ क्षेत्रासाठी पाणी देण्यात येणार आहे. ही योजना प्रस्तावित आहे. यासाठी उजनी बॅकवॉटर क्षेत्रांमध्ये बॅरेजेस उभारण्यासाठी तात्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेवरील ५६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून याचे तात्काळ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. खडकवासला कालवा आणि नीरा डाव्या कालव्याची तसेच त्यांच्या वितरिकांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास विलंब होत आहे. दोन्ही कालव्याची वहन क्षमता वाढविण्यासाठी कालव्याचे अस्तरीकरण आणि काँक्रिटीकरण लवकरच करण्यात येणार आहे.

MPSC च्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी संतापले; राजकीय नेत्यांना केलं लक्ष्य!​

शेटफळ हवेली तलावाची उंची वाढवण्याचे काम आणि सांडवा वितरीकेचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. नीरा नदीवरील जांब, खोरोची, चिखली, वालचंदनगर, कुरवली, निर-निमगाव, पिठेवाडी, बोराटवाडी आणि भीमा नदीवरील भाट निमगाव, टण्णू, नीरा-नरसिंगपूर येथील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरूस्ती करण्याच्या कामाची अंदाजपत्रके तात्काळ तयार करुन कृष्णा खोरे विकास मंडळाकडे सादर करण्यास सांगण्यात आले.

वडिलोपार्जित मालमत्ता एकट्याला हवी आहे, तर...

खोराेचीमध्ये नव्याने होणार बॅरेज
नीरा नदीवरील उद्धट आणि सोमंथळीच्या धर्तीवर खोरोचीमध्ये नीरा नदीवर बॅरेजेस बांधण्याचे नियोजन करण्यात आले. यामुळे इंदापूरच्या पश्‍चिम भागातील नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मोलाची मदत होणार आहे. त्यामुळे खोरोचीच्या बॅरेजचे तात्काळ सर्वेक्षण करून अहवाल महामंडळाकडे सादर करण्याचे निर्देश या बैठकीमध्ये देण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meeting was held at Mantralaya regarding water issue in Indapur taluka