बाबरी पाडताना गाडलेले पऱ्हाड म्हणतात, राममंदिर पाहण्यासाठी मी अजूनही जिवंत आहे...

ayodhya
ayodhya

शिक्रापूर (पुणे) : बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेत ते सर्वात पुढे होते. बाबरीचा एक ढाचा पडला आणि त्याखाली ते गाडले गेले. त्यामुळे सर्वांनी त्यांना तिथेच श्रद्धांजलीही वाहिल्या. पुढे काही जणांना बाबरीच्या दुसऱ्या ढिगाऱ्यात एकाचे पाय हालताना दिसले. त्यामुळे त्याच हालणाऱ्या पायाला धरून अक्षरश: ओढून बाहेर काढले आणि ते चक्क जिवंत निघाले. मूळ शिरूर तालुक्यातील केंदूर येथील व सध्या भोसरी (पिंपरी- चिंचवड) येथील भाजपचे माजी नगरसेवक अमृत पऱ्हाड यांची  ही २८ वर्षांपूर्वीची आश्चर्यकारक सत्यकहाणी उद्याच्या राममंदिर भूमिपुजनाच्या कार्यक्रमानिमित्ताने पुणे जिल्हा बॅंकेच्या माजी संचालिका व शिवसेनेच्या नेत्या जयश्री पलांडे यांनी सांगितली. राममंदिर पाहण्यासाठी मी अजूनही जिवंत आहे, असे म्हणत पऱ्हाड यांनीही त्या प्रसंगाचीही आठवणी जागविल्या.  

अयोध्येत सन १९९२ मध्ये बाबरी मस्जिदच्या ढिगा-यात गाडले गेले म्हणून ज्यांना त्याच दिवशी रामजन्मभूमिवरच श्रध्दांजली अर्पिली गेली ते भाजपाचे भोसरीचे (पुणे) माजी नगरसेवक अमृत प-हाड आजही भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत आणि लालकृष्ण अडवाणींवर जे गुन्हे आहेत त्यातील ते सहआरोपीही आहेत. याबाबत पुणे शहर-जिल्ह्यातून बाबरी मस्जिद पाडण्यासाठी जे काही प्रमुख पदाधिकारी होते त्यातीलच महिला आघाडीच्या प्रमुख जयश्री पलांडे यांनी ही माहिती दिली आणि 
महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केलेले हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते-पदाधिकारी रेल्वेने ६ डिसेंबर १९९२ च्या कारसेवेच्या उद्देशाने ३ डिसेंबर रोजी दिल्लीत उतरले. राज्यातील तत्कालीन विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अण्णा डांगे, प्रकाश जावडेकर, धरमचंद चोरडीया, ना. सं. फरांदे, किरीट सोमय्या, जयसिंगराव गायकवाड, गिरीष बापट, विमल मुंदडा, जयश्री पलांडे, अमृत पऱ्हाड, हेमंत रासने, योगेश गोगावले, उज्वल केसकर, विकास मठकरी, मिलिंद एकबोटे, विजय काळे, ज्योत्सा सरदेशपांडे आदींसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश होता. त्यात शिवसेनेचे पुणे शहर- जिल्ह्यातील अनेक नेते- शिवसैनिकांचाही सहभात वाखाणण्याजोगा होता. सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांच्या या ताफ्यात शिरुर तालुक्यातील २४० भाजप कारसेवकांचे नेतृत्व जयश्री पलांडे यांनी केले होते. त्यांच्याच समवेत असलेले व मूळ शिरुर तालुक्यातील केंदूर येथील असलेले भोसरीचे तत्कालीन भाजप नगरसेवक अमृत पऱ्हाड हे तत्कालीन भाजप जिल्हा उपाध्यक्ष महादेव शितोळे यांच्यासह आक्रमक आघाडीवर होते. 

दरम्यान, तब्बल १६ तास पायपीट आणि हिंदूत्ववादी संघटनांच्या नियोजनानुसार उपलब्ध चारचाकी गाड्यांमधून ४ डिसेंबर रोजी सगळे कारसेवक दिल्लीतून आयोध्येला निघाले. सुमारे दहा ते बारा तासांच्या थांबत- थांबत प्रवासात हा सर्व लवाजमा ६ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास अयोध्येला पोहचला. त्यानंतर साधारण दहाच्या सुमारास प्रत्यक्ष बाबरी मशिद पाडण्याच्या आवाज सुरू झाला आणि उपस्थित नेतेगण, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कारसेवक बाबरी मशिदीकडे झेपावले. याच काळात पोलिसांचीही धावपळ सुरू असताना साधारण अकराच्या सुमारास आपल्यामधील अमृत पऱ्हाड हे बाबरी मशीद पडलेल्या ढाच्याखाली अडकल्याचा एकच गलका झाला. ढाच्याखाली अनेक जण गाडले गेले आणि त्यातील काही जणांना काढले, पण अमृत पऱ्हाड यांचा शोध लागेना. राम मंदिराचे भारावलेले स्वप्न, बाबरी मशिद पाडून एका ठोस कार्यवाहीचे समाधान, यात सगळेच दंग वातावरण असताना अमृत पऱ्हाड यांचा पुन्हा शोध घेतला तरीही ते सापडेना. अखेर रामजन्मभूमीवरच पऱ्हाड हे ’रामप्यारे’ झाल्यावर सगळ्यांचेच एकमत झाले आणि एवढ्या धामधुमीतही त्यांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला. यात पलांडे यांनी पऱ्हाड हे शिरूर तालुक्यातील असल्याने त्यांच्याबाबत खूप आठवणी जागविल्या.

दरम्यान, श्रद्धांजली कार्यक्रम संपताच बाबरी मशिदीच्या पलिकडच्या बाजूने अमृत पऱ्हाड यांचे पाय काही कारसेवकांना दिसल्याचा आवाज झाला. आता सगळे नेते-कार्यकर्ते तिकडे धावले. सुमारे अर्धा तासांच्या अथक प्रयत्नाने पलांडे व त्यांच्या सहकारी कारसेवकांनी दिसत असलेल्या पायला धरुन अक्षरश: ओढून बाहेर काढले, तर पऱ्हाडे हे जिवंत असल्याचे लक्षात आले आणि त्यांना फैजाबाद शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अर्थात एवढे होऊनही रामंदिरासाठी आम्ही जे केले त्याचा अभिमान तर वाटतोच, शिवाय आमच्याच हयातील राममंदिर उभे राहतेय, त्याचा अभिमान वाटत असल्याचे पलांडे व पऱ्हाड यांनी आवर्जून सांगितले. 

बाबरी मशिदीचा ढाचा अंगावर पडल्यावर काहीच हालचाल करता येईना. काहीवेळ गडबड गोंधळ ऐकू येत असताना पुढे काहीच समजेनासे झाले आणि मी १५ डिसेंबर रोजी शुद्धीवर आलो. त्यावेळी अडवाणींसोबत बाबरी मशिद पाडण्यातल्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे तेथील पोलिसांनी मला सांगितले. अशातच या हॉस्पिटमध्येच एक बॉंबस्फोट झाला आणि आम्ही तर पुन्हा एकदा मेल्यासारखे तसेच पडून राहिलो. अर्थात एकामागोमाग एक संकटांनी मी बेजार झालो असलो, तरी माझा बाबरीच्या प्रकरणातला सहभाग नक्कीच होता, हे मला नाकारायचे कारणच नव्हते. कारण, बाबरी मशिदीखाली मी सापडणे, हेच ते माझे आरोप सिद्धतेचे कारण होते. या गुन्ह्याच्या सुनावण्या अद्यापही चालू आहेत. मात्र, खंत एकच अशी की, आता उद्याच्या राममंदिर भूमिपुजन कार्यक्रमाला अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, साध्वी ऋतुंभरा, उमा भारती आदी नेते असायलाच हवे आहेत. 
 - अमृत पऱ्हाड  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com