केंद्र सरकारने मागविला मेट्रोचा अहवाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

काय आहे मागणी
पिंपरी ते स्वारगेट मेट्रोचे काम सुरू असतानाच या मार्गाचा विस्तार करून तो निगडीपर्यंत न्यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमने लावून धरली आहे. पिंपरीमधून सुरू होणाऱ्या मेट्रोचा फायदा चिंचवड, प्राधिकरण, आकुर्डी या भागातील नागरिकांना होत नसल्याने हा मार्ग निगडीपर्यंत न्यावा. या भागातील नागरिकांना मेट्रोसाठी पिंपरीला यावे लागणार आहे. त्याचा वेळ खर्च होणार असून आर्थिक तोटाही सहन करावा लागणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची मागणी आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये विस्तार केल्यास सध्या त्यासाठी येणाऱ्या खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे आताच हे काम सुरू करण्याची त्यांची मागणी आहे.

पिंपरी - पिंपरी ते स्वारगेट दरम्यान धावणाऱ्या मेट्रोचा विस्तार निगडीपर्यंत करण्याच्या मागणीने जोर धरला असला तरी या मार्गाचा खर्च कसा करणार? याचा अहवाल केंद्र सरकारने मागविला आहे. राज्य सरकारने त्यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर या प्रस्तावाच्या मान्यतेला गती मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी ते निगडी दरम्यानचे मेट्रोचे अंतर चार किलोमीटरचे आहे. त्याच्या उभारणीसाठी एक हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे हा निधी कसा उभा राहणार? अशी विचारणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. तर मेट्रोने निगडीपर्यंत विस्ताराचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो मान्यतेसाठी केंद्राकडे पाठविला आहे. मात्र, जोपर्यंत निधी उभारणीच्या प्रश्‍नाबाबत त्यांचे समाधान होत नाही, तोपर्यंत प्रस्ताव मंजुरी मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

परीक्षेचे टेंशन कसले घेता बिनधास्त बोला

पिंपरी ते निगडीपर्यंतचे मेट्रोचे विस्तारीकरणाचे काम करण्यासाठी निधीची आवश्‍यकता आहे. केंद्र सरकारकडून यासंदर्भातील अहवाल मागविला आहे. विस्तारीकरणाच्या कामात महापालिका, राज्य सरकार यांच्याकडून कसा निधी उपलब्ध होणार आहे? याची माहिती राज्य सरकारने केंद्र सरकारला कळविल्यानंतरच निर्णय होणार आहे.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro report demand by central government