
पुणे स्मार्ट सिटीच्या कामाबाबत खासदार गिरीश बापट यांच्यासह पुणे महापालिकेच्या नगरसेवकांनीही मोठ्याप्रमाणावर आक्षेप घेतले असून, त्याबाबतही मिश्रा यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
पुणे - केंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव आणि महामेट्रोचे चेअरमन दुर्गा शंकर मिश्रा पुण्याच्या दौऱ्यावर येत असून ते पुणे मेट्रोच्या तसेच स्मार्ट सिटीच्या कामांचा लेखाजोखा घेणार आहेत. पुणे स्मार्ट सिटीच्या कामाबाबत खासदार गिरीश बापट यांच्यासह पुणे महापालिकेच्या नगरसेवकांनीही मोठ्याप्रमाणावर आक्षेप घेतले असून, त्याबाबतही मिश्रा यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
मेट्रोमुळे पुण्याचे जीवनमान बदलेल;ब्रिजेश दीक्षित यांचा विश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे मेट्रो आणि स्मार्ट सिटी हे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. पुण्यात मेट्रोचे काम वेगाने सुरू असताना स्मार्ट सिटीच्या कामांबाबत मात्र कोणतीही प्रगती दिसत नसल्याबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. खासदार बापट यांनी स्मार्ट सिटीच्या कामांबाबत विविध आक्षेप नोंदवत याकामांची तातडीने चौकशी करावी, असे पत्रच केंद्रीय सचिवांना पाठवले होते. या पार्श्वभूमीवर मिश्रा दोन दिवसांच्या दौऱ्यावर पुण्यात येत आहेत. या दौऱ्यात ते स्मार्ट सिटीच्या कामांचा लेखाजोखा घेणार आहेत. स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेताना कामाची गती, सल्लागारांची नियुक्ती आदींवरही मिश्रा चर्चा करणार आहेत. पुणे मेट्रोच्या विविध कामांची पाहणीही ते करणार आहेत. महामेट्रोच्या विविध प्रकल्पांचा आढावाही या बैठकीत होणार आहे.
हेही वाचा : संकट आलं पण काम थांबलं नाही; सीरममध्ये कर्मचारी आले कामावर, लशीची खेपही रवाना
दरम्यान, खासदार बापट यांनी आपण मिश्रा यांची भेट घेऊन स्मार्ट सिटीच्या कामकाजाबाबत वस्तुस्थिती मांडणार असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले. केंद्रीय सचिव पुण्यात येत असताना त्याची माहिती आपणाला कळविण्यात आली नसल्याची तक्रारही त्यांनी केली.