पुण्यातील कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला खळबळजनक खुलासा

सागर आव्हाड
Sunday, 10 January 2021

''भाजप कुराण व गीता हे पवित्र ग्रंथ न वाचता फक्त कपाटात ठेवते. भाजपने कुराण व गीता हे वाचून घ्यायला हवेत तरच त्यांना त्यातील सार कळेल. हे ग्रंथ न वाचता ते वर्तन करतात म्हणून देशात दंगली घडतात.'' असा खळबळजनक खुलासा मंत्री सत्तार यांनी केला. 

पुणे : पुण्यातल्या कोंढवा परिसरात  जमियत उलमाँ व प्रसाद बाबर यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते, येथील रक्तदान शिबिरात हजेरी लावत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ''भाजप कुराण व गीता हे पवित्र ग्रंथ न वाचता फक्त कपाटात ठेवते. भाजपने कुराण व गीता हे वाचून घ्यायला हवेत तरच त्यांना त्यातील सार कळेल. हे ग्रंथ न वाचता ते वर्तन करतात म्हणून देशात दंगली घडतात.'' असा खळबळजनक खुलासा मंत्री सत्तार यांनी केला. 

हे वाचा - तात्काळ राजीनामा द्या नाहीतर महाभियोग आणू; ट्रम्प यांना इशारा

यावेळी रक्तदान करणाऱ्या नागरिकांना गीता आणि कुराण हे दोन्ही पवित्र देण्यात आले. यावेळी माजी आमदार महादेव बाबर, आमदार चेतन तुपे, रशीद शेख, अंजुम इनामदार आदी उपस्थित होते. 

पुढे सत्तार म्हणाले, ''कोरोना काळात मुस्लिम बांधवांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्याय केला असा आरोप विरोधक करत आहेत. या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत विरोधक गैरसमज पसरवत आहेत. कोरोनाच्या काळात जगभरातील देशांत मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमण होते आहे. जगाच्या तुलनेत भारतात संक्रमणाचे प्रमाण कमी झाले आहे. हे सर्व अल्लाताला व राज्याच्या आरोग्य यंत्रणेमुळे शक्य झाले आहे.'' 

भाजप नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर बोलताना ते म्हणाले, ''दानवे यांना पाडल्याशिवाय मी टोपी काढणार नाही. विधानसभा निवडणुकीत दानवे यांनी धोका दिला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे..

हे वाचा - शक्तीशाली ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार; उरले दोनच पर्याय

''औरंगाबादच्या नामांतरणाबाबत ते म्हणाले, औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलनाच होऊ शकत नाही. आता तर मीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर निष्ठा आसणाऱ्या पक्षात आलो आहे. समाजात तेढ निर्माण होण्यासाठी काही लोकं पुड्या सोडत आहेत. त्यात काही तथ्य नाही. वेरूळ-अजिंठा येथे छत्रपती शिवाजी महाराज याचं स्मारक बांधत आहोत. त्यांचं काम जागतिक स्थरावर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मी पुन्हा येईल म्हणणारे काही पुन्हा आलेच नाहीत; अशी कोटी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister abdul sattar criticizes bjp at a program in pune