esakal | "राज्यातील ऐतिहासिक सत्तांतरात फडणवीसांचा वाटा मोलाचा"
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

मराठवाड्यातील विकासाच्या अनुशेषाच्या केवळ गप्पा मारून उपयोग नाही, त्या विभागाला राज्याच्या अन्य भागांच्या बरोबरीने आणण्यासाठी गुंतवणूक आणली पाहिजे, याची कल्पना असल्यामुळे देवेंद्रजींनी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’चे वारे मराठवाड्यातही पोचविले. हरंगूळ येथे रेल्वेच्या बोगी बनविण्याचा कारखाना उभा करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. त्यांना जागा उपलब्ध करून दिली. आज ५०० कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्पाचा पहिला टप्पा मार्गी लागलेला आहे. या प्रकल्पातून ५० हजार जणांना प्रत्यक्ष आणि साडेतीन लाख जणांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. मराठवाड्याची लाइफलाइन बदलवणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे.

- संभाजीराव निलंगेकर पाटील, आमदार

"राज्यातील ऐतिहासिक सत्तांतरात फडणवीसांचा वाटा मोलाचा"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोठ्या प्रमाणात नागरीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशीही जोडला गेलेला मोठा भाग यामुळे महाराष्ट्र आज एका मोठ्या स्थित्यंतरातून जातो आहे. त्यामुळे दोन्ही विषयांची सारखीच समज आणि समान संवेदनशीलता असणारे नेतृत्व ही महाराष्ट्राची या स्थित्यंतराच्या काळात गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला असे नेतृत्व लाभलेले आहे, हे विधान मी ठामपणाने मांडू शकतो.

देवेंद्रजीशी माझा जिव्हाळ्याचा आणि अनेक वर्षांचा स्नेह आहे. देवेंद्रजी प्रदेश भारतीय जनता पक्षाचे महामंत्री होते, तेव्हापासून त्यांच्यासमवेत काम करण्याची मला संधी लाभली. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर माझ्यावर प्रदेश महामंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे संघटनात्मक कामातून आम्ही एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. त्यांच्यातील तडफदार कार्यकर्ता, उत्कृष्ट संघटक मी जवळून अनुभवला आहे. कार्यकर्त्यांशी अत्यंत आपुलकीने वागून आपलेसे करणारा आणि त्यांच्यात ऊर्जा निर्माण करून संघर्षाला सज्ज करणारा या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन्ही अंगांचे मला कौतुक वाटते. प्रदेशस्तरावर एकत्रित काम करताना मी त्यांचा झपाटा अनुभवला आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत संपर्क करायचा, त्यांच्या प्रश्नांना विधिमंडळात अभ्यासपूर्ण वाचा फोडायची आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करायचा, हा त्यांचा स्वभाव आहे. या साऱ्या गोष्टी त्यांच्यात स्वाभाविक आहेत. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ऐतिहासिक सत्तांतर होण्यात त्यांच्या या भूमिकेचा मोठा वाटा आहे. भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढत असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. कार्यकर्त्यांचे बळ जागविले. उमेदवारांना शक्ती दिली आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचा आजवरचा सर्वांत मोठा विजय साकारण्यात सिंहाची भूमिका बजावली.

हेही वाचा: जयंत पाटलांनी सांगितलं अजित पवारांच्या स्वभावाच गुपित

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देवेंद्रजींनी स्वीकारल्यावर त्यांच्यातील संवेदनशीलतेचे प्रतिबिंब त्यांच्या कारभारात देखील पडताना अवघा महाराष्ट्र पाहतो आहे. मराठवाडा व विदर्भाकडे ते विशेषत्वाने लक्ष पुरवत आहेत. संघटनात्मक काम करताना त्यांनी हा भाग पालथा घातलेला असल्याने येथील समस्यांची माहितीही त्यांना होतीच. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली आहेत. दुष्काळ आणि रोजगाराचा अभाव ही या दोन्ही भागांतील प्रमुख समस्या आहे. दुष्काळामुळे शेती परवडत नाही आणि रोजगाराचीही संधी नाही, यामुळे मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर अन्यत्र स्थलांतर होताना दिसते. परवडणाऱ्या शेतीसाठी सहकार्य आणि रोजगाराअभावी होणारे स्थलांतर थांबविणे, यावर देवेंद्रजींनी आपले सारे लक्ष केंद्रित केले आहे. मराठवाडा व विदर्भ या दोन्ही भागांना राज्याच्या इतर भागांच्या बरोबरीने आणणे व स्पर्धेत टिकण्याच्या दृष्टीने मजबूत बनविणे, हा केवळ ध्यास घेऊन ते थांबले नाहीत, तर त्यासाठी लागणारे निर्णय घेण्यास सुरुवात केली. या वंचित भागाशी सातत्याने संवाद साधणे आणि त्यांची भूमिका, प्रश्न जाणून घेत योग्य दिशा ठरविणे, ही त्यांची कार्यपद्धती राहिलेली आहे.

मराठवाड्यात विकासकामे

मी लातूर जिल्ह्यातील आहे. लातूरचा दुष्काळ हा सर्वपरिचित आणि वर्षानुवर्षे राहिलेला आहे. राज्यात सर्वाधिक टँकर लागणारा जिल्हा ही लातूरची ओळख होती. ‘जलयुक्त शिवार योजने’तून ही ओळख पुसून टाकण्याच्या दिशेने आज मुख्यमंत्र्यांनी टाकलेल्या पावलांचे यश दिसण्यास प्रारंभ झालेला आहे. पूर्वी या भागात रोज ६५० टँकरलागत. आज हे प्रमाण त्याच्या दहा टक्क्यांवर आलेले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे स्थलांतर रोखायचे असेल तर पाणी, वीज आणि तत्सम पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत, हा निर्धार करून ते योजना राबवताहेत.

हेही वाचा: पुणे : घाटमाथ्यावर अति मुसळधार तर शहरात मध्यम पावसाची शक्यता

मराठवाड्यातील विकासाच्या अनुशेषाच्या केवळ गप्पा मारून उपयोग नाही, त्या विभागाला राज्याच्या अन्य भागांच्या बरोबरीने आणण्यासाठी गुंतवणूक आणली पाहिजे, याची कल्पना असल्यामुळे देवेंद्रजींनी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’चे वारे मराठवाड्यातही पोचविले. हरंगूळ येथे रेल्वेच्या बोगी बनविण्याचा कारखाना उभा करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. त्यांना राज्य शासनाच्या वतीने जागा सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली. आज ५०० कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्पाचा पहिला टप्पा मार्गी लागलेला आहे. या प्रकल्पातून ५० हजार जणांना प्रत्यक्ष आणि साडेतीन लाख जणांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. मराठवाड्याची लाइफलाइन बदलवणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे. मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठीच्या या ऐतिहासिक निर्णयाचे निर्विवाद श्रेय मी देवेंद्रजींना देईन. विक्रमी वेळेत हा प्रकल्प सुरू झालेला आहे. मराठवाड्यातील हा भाग देशाच्या नकाशावर ठळकपणाने आला आहे.

विकासाचा कार्यक्रम राबविण्यासाठी लागणारा कामाचा झपाटा, प्रामाणिकपणा आणि सचोटी हे देवेंद्रजींचे गुण आहेत. अत्यंत स्वच्छ कारभार आणि प्रत्येक विषयाची बारकाईने जाण यांमुळे त्यांचे निर्णय दूरदृष्टीने होतात. महाराष्ट्राला साजेसे आधुनिक आणि प्रागतिक नेतृत्व त्यांच्याकडे आहे. शहर आणि ग्रामीण महाराष्ट्र या दोन्ही भागांना परस्परपूरक ठरेल असे निर्णय घेण्यासाठी लागणारी मानसिकता त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री लाभणे आणि त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळणे, याचे मला मनापासून समाधान आहे. त्यांचा मला आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि विशेषत्वाने तरुणांना अभिमान आहे. त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो, हीच प्रार्थना!

(‘कार्यक्षमता, निर्भयता, विनम्रता’ या मा. आमदार जगदीश मुळीक संकल्पित पुस्तकातून साभार (२०१८)

loading image