मनसेला लागला राँगनंबर; बांग्लादेशींच्या शोध मोहिमेतील "ते' निघाले भारतीय! 

टीम ई-सकाळ
Saturday, 22 February 2020

धनकवडीजवळील बालाजीनगर येथील गुलमोहर सोसायटीमध्ये राहणाऱ्या काही व्यक्ती या बांग्लादेशी असल्याचा संशय मनसेच्या कार्यकर्त्यांना होता.

पुणे : राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईपाठोपाठ पुण्यातील कार्यकर्त्यांनीही बांग्लादेशींचा युद्धपातळीवर शोध सुरू केला. रविवारी सकाळी साडे आठ वाजता पोलिसांना घेऊन मनसेचे कार्यकर्ते बालाजीनगरमधील एका इमारतीतील दोन घरात पोचले. संशयावरुन त्यांनी तिघांकडे चौकशी केली, त्यांना पोलिस ठाण्याला आणले. मात्र त्यांनी पुराव्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी व कसून चौकशीनंतर "ते' भारतीयचं असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी सोडल्यानंतर "धर्मावरुन आमच्याकडे संशयित नजरेने पाहणे हे फार वेदनादायी आहे' असे शब्द त्यांच्या ह्दयातुन ओठांवर आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धनकवडीजवळील बालाजीनगर येथील गुलमोहर सोसायटीमध्ये राहणाऱ्या काही व्यक्ती या बांग्लादेशी असल्याचा संशय मनसेच्या कार्यकर्त्यांना होता. त्यातुन रविवारी सकाळी साडे आठ वाजता मनसेच्या कार्यकर्ते सहकानगर पोलिसांना आपल्यासमवेत घेऊन त्यांच्या घरी दाखल झाले. तेथे राहणाऱ्या दिलशाद मन्सुरी, रोशन शेख, बप्पी सरदार हे तिघेजण पोलिस व कार्यकर्त्यांना पाहून घाबरले.

आणखी वाचा - वंजित बहुजन आघाडीला भगदाड; 50 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे 

पोलिसांनी त्यांना कागदपत्रांची विचारणा केली. त्यानंतर त्यांना सहकारनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दिवसभर त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तिघांनीही पुराव्यापोटी त्यांच्याकडील कागदपत्रे पोलिसांकडे दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधीत कागदपत्रांची पडताळणी केली.चौकशी व कागदपत्रांच्या पडताळणीनंतर ते तिघेजण उत्तर प्रदेश व कोलकत्ता येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता पोलिसांनी त्यांना सोडून दिले. 

आम्ही पोटासाठी गाव सोडून पुण्यात आलो. कच्छी दाबेलीचा स्टॉल चालवून उदरनिर्वाह भागवितो. आम्हाला मनसे कार्यकर्त्यांनी भारतीयत्वाचा पुरावा मागितला. दिवसभर चौकशी केली, याचा खुप मनस्ताप झाला.  
-दिलसाद मन्सुरी

आम्ही भारतीय असल्याचे सर्व पुरावे सादर केले, गरज पडल्यास पुन्हा करू. पण अशा प्रकारे आमच्या धर्मावरून आमच्याकडे संशयी नजरेने बघणे फार वेदनादायी आहे.
- रोशन शेख 

..ते आहेत कष्टकरी 
बप्पी व रोशन हे दोघेही मुळचे कोलकत्त्याचे रहीवासी आहेत. बप्पी सहा वर्षांपुर्वी पुण्यात आला. सध्या तोह मेट्रो प्रकल्पावर कंत्राटी पद्धतीने इलेक्ट्रीाशीयनचे काम करतो. तर रोशन बारा वर्षांपुर्वी पुण्यात आला असून तो सोने पॉलिशचे काम करतो. दिलसाद हा उत्तर प्रदेशातील बीजनौर येथील असून तो 18 वर्षांपासून पुण्यात राहात आहे. सध्या तो बालाजीनगरमध्येच कच्छी दाबेलीचा स्टॉल चालवितो. 

आम्ही त्या तिघांची कसून चौकशी केली आहे. त्यांच्याकडील कागदपत्रांच्या पडताळणीवरुन ते भारतीयच असल्याची ओळख पटली आहे.
- नंदकुमार बिडवई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहकारनगर पोलिस ठाणे. 

गुलमोहर सोसायटीत बांग्लादेशी राहात असल्याची खबर मिळाली होती. आम्ही काही दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवले. त्यावेळी ते रोज रात्री एक-दिड वाजता येतात व सकाळी साडेआठ वाजता घराबाहेर पडतात. त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.
- सचिन काटकर, अध्यक्ष, धनकवडी उपविभाग, मनसे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns bangladeshi search operation got two muslims from uttar pradesh