

आता तालुकास्तर मॉन्सून आगमनाचा अंदाज
- विदर्भातील तालुक्यांचा समावेश
- आयएमडीकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर
- पर्जन्यमानाचा एक कमीपर्यंत अतिस्थानिय अंदाज शक्य
पुणे : मॉन्सून आगमनाचा तालुकास्तरीय अंदाज देण्याबरोबरच, पर्जन्यमानाचा एक किलोमीटर सूक्ष्मतेपर्यंत अतिस्थानिय अंदाज आता शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. कृत्रिम बुद्धिमता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान विभागातर्फे यंदाच्या मॉन्सून हंगामापासून या दोन्ही सेवा सुरू करण्यात येणार आहेत. तालुकास्तरीय मॉन्सून आगमन अंदाज सेवेत विदर्भातील तालुक्यांचा समावेश करण्यात आहे.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते मंगळवारी (ता १२) देशाच्या विविध भागांत मॉन्सून प्रगतीचा अंदाज आणि उत्तर प्रदेशासाठी अति स्थानिय अंदाज सेवेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी पृथ्वी विज्ञान विभागाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महोपात्रा, आयआयटीएमचे संचालक डॉ. सूर्यचंद्र राव आदी उपस्थित होते.
‘मिशन मॉन्सून’अंतर्गत हवामान अंदाज सुधारण्यासाठी हवामान विभाग प्रयत्नशील आहे. कृषी विभागाची गरज लक्षात घेऊन स्थानिक उच्च स्पष्टता पर्जन्यमान अंदाज सेवा सुरू करण्यात आली आहे. यातून पुढील दहा दिवसांसाठी एक किलोमीटर सूक्ष्मतेचा अंदाज प्रत्येक तासाला उपलब्ध होणार आहे. हवामान माहिती संकलन केंद्रांची संख्या अधिक असल्याने उत्तर प्रदेशात प्रायोगिक तत्त्वावर सेवा सुरू करण्यात आली असून, इतर राज्यातही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.
मॉन्सूनचे केरळातील आगमन झाल्यानंतर क्रमाक्रमाने देशातील वाटचाल स्पष्ट करण्यात येते. मात्र आता देशभर तालुकास्तरावर मॉन्सून कधी दाखल होईल याचा अंदाज दिला जाणार आहे. यासाठी हवामान विभागाकडून देशाच्या विविध भागांतील मॉन्सून आगमनाचा अंदाज वर्तविणारी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत देशातील १५ जिल्हे आणि एक केंद्रशासित प्रदेशामधील ३१९६ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक बुधवारी चार आठवड्यांचा अंदाज जाहीर केला जाणार आहे. भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान शास्त्र संस्थेने ही प्रणाली विकसित केली आहे.
राज्यमंत्री जितेंद्र सिंग म्हणाले, की बदलते हवामान नमुने आणि वाढत्या तीव्र हवामान घटनांमुळे अचूक अंदाज वेळेवर देणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. हवामान पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी देशात ५० ठिकाणी डॉप्लर रडार बसविण्यात आले असून, आणखी ५० रडार उभारण्याची योजना आहे. प्रगत तंत्रज्ञान, डेटा एकत्रीकरण, आणि आधुनिक प्रणालींच्या वापरामुळे भारताच्या हवामान अंदाज क्षमतेत परिवर्तन झाले आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या दोन्ही सेवा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, शेतकरी आणि नागरिकांना उपयुक्त ठरणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.