बारामतीकरांनो काळजी घ्या, त्रिशकानंतरही कोरोनाचा धुमाकूळ

मिलिंद संगई
Thursday, 13 August 2020

बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांनी आज तीनशेचा टप्पा ओलांडला. कोरोनामुक्त असलेल्या बारामतीत तीनशेंचा टप्पा वेगाने ओलांडल्याने आता नागरिकांनी कमालीची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

बारामती (पुणे) : बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांनी आज तीनशेचा टप्पा ओलांडला. कोरोनामुक्त असलेल्या बारामतीत तीनशेंचा टप्पा वेगाने ओलांडल्याने आता नागरिकांनी कमालीची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दररोज नियमितपणे रुग्ण सापडत असलयाने दिवसागणिक लोकांची भीतीही वाढू लागली आहे. 

अरे वा, 95 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात 

रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची गरज आता नागरिक बोलून दाखवित आहे. दरम्यान बारामतीतील रुग्णसंख्या आता 308 वर जाऊन पोहोचली आहे. काल रात्री बारामती ग्रामीण येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 21 वर जाऊन पोहोचली आहे. तर, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 134 वर जाऊन पोहोचली असून, 153 रुग्ण कोरोनाबाधित असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, दौंडमध्ये मुगाचे दिवसाआड लिलाव

बारामतीतील रुग्णांची नियमितपणे वाढणारी संख्या रोखण्यासाठी काय करावे, याने आता प्रशासनही हतबल झाले आहे. रोज येणारे रुग्ण, त्यांच्या संपर्कातील लोकांचे नमुने घेणे व त्यात पुन्हा पॉझिटीव्ह येणाऱ्यांची रुग्णालयात सोय करणे, यातच प्रशासन गर्क आहे. नगरपालिकेने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरु केलेले असले, तरी रुग्ण संख्या कमी होत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 
गर्दी कमी करण्यासाठी आता काही पुन्हा पावले उचलण्याची गरज बोलून दाखविली जात आहे. काही दुकानदारांनी गर्दी उसळलेली पाहून आज स्वतःहून काही काळासाठी दुकाने बंद केली होती. गर्दी कमी व्हावी, या साठी नागरिकांनीच काही पथ्ये पाळण्याची गरज आता निर्माण झाली आहे. 

दुसरीकडे पावसाचे दिवस असल्याने डासांची पैदास होऊन डेंगीचे संकट उद्भवू नये, या साठी मच्छरदाणीचा वापर, डास चावणार नाहीत, याची काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than 300 corona patients in Baramati taluka