esakal | सर्वसामान्य नागरिकांच्या बॅंक खात्यांवर 'सायबर धाड'; गुन्ह्यांचा आकडा पाहून व्हाल अवाक!
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber_Crime

मागील वर्षभरात ८ हजार सायबर गुन्हे घडले, तर यावेळी जुलै महिन्यापर्यंतच सायबर गुन्ह्यांनी आठ हजारांचा टप्पा पार केला आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या बॅंक खात्यांवर 'सायबर धाड'; गुन्ह्यांचा आकडा पाहून व्हाल अवाक!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कात्रजमध्ये राहणाऱ्या आणि खासगी कंपनीत नोकरीला असणाऱ्या ५० वर्षीय महिलेस एकाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर संबंधीत व्यक्तीने मैत्री करून महिलेचा विश्‍वास मिळविला. काही दिवसांनी महिलेस महागडे गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेकडून वेळोवेळी तब्बल ४३ लाख ३५ हजार रुपये ऑनलाईन माध्यमाद्वारे घेत महिलेची फसवणूक केली.

तर खडकीतील ७४ वर्षीय महिलेस अनोळखी व्यक्तीने फोन करुन बॅंक खाते अद्ययावत करण्याचा बहाणा करीत तिच्याकडून बॅंक व डेबीट कार्डची माहिती घेतली. त्यानंतर पुढच्या काही मिनीटातच महिलेच्या बॅंक खात्यातील सव्वा लाख रुपये काढून घेतले. अशा प्रकारे ऑनलाईन फसवणूकीच्या एक, दोन नव्हे, तर मागील सात महिन्यात तब्बल आठ हजाराहून अधिक घटना घडूनही सायबर गुन्हेगार मोकाट फिरत असल्याचे वास्तव आहे. याबरोबरच मागील तीन ते चार वर्षांच्या तुलनेत यंदा 'रेकॉर्ड ब्रेक' सायबर गुन्हे नोंदविले जाण्याची शक्‍यता आहे. 

यंदा पुण्यानं घेतली आघाडी; स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे 'टॉप-२०'मध्ये!​

लॉकडाऊनमध्ये आणि लॉकडाऊन शिथील झाल्यानंतरही शहरातील गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण दरवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे समाधानकारक चित्र होते. मात्र ही कसर सायबर गुन्हेगारांनी भरुन काढल्याची सद्यस्थिती आहे. कधी बॅंकेतून, तर कधी मोबाईल, विमा कंपनी किंवा अन्य एखाद्या कार्यालयातून बोलत असल्याची किंवा काही वेळा तर काहीवेळा भारतीय लष्करातील अधिकारी असल्याची बतावणी करून नागरिकांच्या बॅंक व डेबीट, क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती घेऊन सायबर गुन्हेगार त्यांच्या बॅंक खात्यातील लाखो रुपये काढून घेत आहेत. मागील काही महिन्यांपासून पेटीएम, ओएलएक्‍स सारख्या कंपन्यांच्या नावाने सायबर गुन्हेगार नागरीकांन फोन, मेसेज, ईमेल करणे, लिंक भरण्यास भाग पाडून त्यांची बॅंक खाती रिकामे करत असल्याचे चित्र आहे. 

अखेर 'पीएमपी'चा मुहूर्त ठरला; 'या' तारखेपासून बस रस्त्यावर धावणार!​

मागील वर्षभरात ८ हजार सायबर गुन्हे घडले, तर यावेळी जुलै महिन्यापर्यंतच सायबर गुन्ह्यांनी आठ हजारांचा टप्पा पार केला आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ व्यावसायिक व अन्य प्रकारच्या फसवणुकीच्या घटना घडत आहेत. 
सायबर गुन्हेगारांकडून फिशींग, हॅकींग, नोकरीचे आमिष, बॅंक, विमा, ऑनलाईन खरेदी-विक्री अशा विविध प्रकारांद्वारे सर्वसामान्य नागरिकांना गंडा घालण्याचे सत्र सुरू आहे. सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला वृद्ध नागरीक, महिलांबरोबरच तरुणही मोठ्या संख्येने बळी पडत आहेत. 

ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी 
2017 - 3000 
2018 - 5524 
2019 - 7 हजार 995 
2020 (जुलै अखेर) - 8 हजार 122 

ऑनलाईन फसवणूक - 4 हजार 926 
व्यावसायिक फसवणूक - 1456 
सोशल नेटवर्कींग -1104 
मोबाईल गुन्हे - 215 
हॅकींग - 181 
डेटा चोरी - 06 

Video : पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांपुढे काय आहेत आव्हाने?; पाहा 'सकाळ स्पेशल इंटरव्ह्यू'मध्ये!​

हे नियम पाळा अन्‌ फसवणूक टाळा ! 
- अनोळखी व्यक्तीचे फोन, मेसेज, ईमेल किंवा लिंकला प्रतिसाद देऊ नका 
- अनोळखी व्यक्तीला आपल्या डेबीट, क्रेडिट कार्ड व बॅंक खात्याबाबतची गोपनीय माहिती देऊ नका 
- ई-वॉलेट, फेसबुक, ट्‌विटर अशा सोशल नेटवर्कींग साईटवर वैयक्तीक माहिती देणे टाळा 
- पेट्रोल पंप, मॉल्स, हॉटेल्समधील 'फिडबॅक फार्म'वर सखोल वैयक्तीक माहिती देऊ नका 
- कोणत्याही ई वॉलेटची इत्यंभुत माहिती असल्याशिवाय ऑनलाईन व्यवहार करु नका 
- पुरेशी खात्री करुनच ई वॉलेटमधील 'पे' हा पर्याय वापरा 

''मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सात महिन्यातच आठ हजारांहून अधिक सायबर गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या घटना जास्त आहे. या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेऊन सायबर गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी सायबर पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.''
- संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा. 
 
''मी एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहे. मला पेटीएम अपडेक करुन देतो, असे सांगून एका व्यक्तीने माझ्या बॅंक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर माझ्या बॅंक खात्यातील एक लाख रुपये काढून घेतले. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.''
- नझीम शेख, ऑनलाईन फसवणुक झालेला तरुण.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top