पुणे विद्यापीठाचा अजबगजब कारभार; मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना 'ऑनलाईन'मध्ये आले इंग्रजीतून प्रश्न!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी गावी गेल्याने त्यांच्याकडे पुस्तके उपलब्ध नसल्याबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारी येत होत्या. यावर विद्यापीठाकडून प्रश्नसंच पुरविण्यात येतील असे जाहीर करून देखील विद्यार्थ्यांना ते अद्याप मिळाले नाहीत.

मंचर (पुणे) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांना सोमवारपासून (दि.12) सुरुवात झाली. अंतिम सत्र आणि बॅकलॉग परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्‍न पद्धतीने होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देत विद्यापीठाने ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतही दिली. त्यानंतर विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले. बॅकलॉगच्या काही विषयांची परीक्षा १२ ऐवजी १७ ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने परीक्षेच्या एक दिवस अगोदर जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

MPSCने कसली कंबर; नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठीची तयारी अंतिम टप्प्यात

अशातच सोमवारी काही विषयांच्या ऑनलाइन आणि ऑफलाईन परीक्षा सुरू झाल्या. सकाळी १० वाजता ऑफलाईन सुरू होणारा पेपर १२ वाजता सुरू झाला आणि दुपारी १ वाजता सुरू होणारा पेपर अडीच वाजेपर्यंतही सुरू झाला नव्हता. तसेच एम.ए. राज्यशास्त्राच्या मराठी माध्यमातून ऑनलाइन पदव्युत्तर परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना बहुतांशी प्रश्न हे इंग्रजी माध्यमातून विचारले गेल्याने विद्यापीठाच्या कार्यपद्धतीवर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुणे विद्यापीठामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

परीक्षेसाठी पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांतील एकूण 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील 2 लाख विद्यार्थी ऑनलाइनद्वारे परीक्षा देणार आहेत. सुमारे 3 हजार 300 विषयांची परीक्षा होणार आहे. विद्यापीठाने कळविल्यानुसार परीक्षा सुरू झाल्या तरी अद्याप पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विविध विषयाचे सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही, असे विद्यापीठाकडून वारंवार सांगितले जात असले तरी मराठी माध्यमातून परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना बहुतांशी प्रश्न इंग्रजी माध्यमातून विचारले गेल्याने विद्यार्थ्यांना या विषयात गुण कमी पडून त्याचे वर्ष पुणे विद्यापीठाच्या चुकीमुळे वाया जाणार आहे. यासंदर्भात युवा सेनेचे विस्तारक सचिन बांगर यांनी पुणे विद्यापीठासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

'पहिल्यांदा चांगलं वाटलं, पण आता ताण येतोय'; 'वर्क फ्रॉम होम'ला कंटाळले कर्मचारी​

लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी गावी गेल्याने त्यांच्याकडे पुस्तके उपलब्ध नसल्याबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारी येत होत्या. यावर विद्यापीठाकडून प्रश्नसंच पुरविण्यात येतील असे जाहीर करून देखील विद्यार्थ्यांना ते अद्याप मिळाले नाहीत. शिवाय एम.ए. राज्यशास्रच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजीतून प्रश्न विचारून पुणे विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे केल्या आहेत. याबाबत युवासेनेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे पुणे विद्यापीठाच्या गलथान कार्यपद्धतीबाबत तक्रार करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'या' किल्ल्यावर अचानक वाढली गर्दी​

"युवासेना विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे. ऑनलाईनची परिस्थिती वाईट आहे हे माहिती होतं, त्यामुळेच युवासेनेच्यावतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना तत्काळ प्रश्नसंच उपलब्ध करून द्यावेत. तसेच पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देत असलेल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीतून प्रश्न विचारल्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना पूर्ण गुण द्यावेत. अन्यथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठावर युवासेनेतर्फे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा युवासेनेचे विस्तारक सचिन बांगर यांनी दिला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most of questions were asked to students of Marathi medium of MA Political Science through English