esakal | HappyBirthday:म्हणून, सुप्रिया सुळे बनल्या संसदरत्न
sakal

बोलून बातमी शोधा

mp supriya sule birthday special article

एका वलयांकीत घराण्याच्या प्रतिनिधी असतानाही सामान्य जनतेशी नाळ कशी जोडून ठेवायची याचा वस्तुपाठच सुप्रिया सुळे यांनी घालून दिलेला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात त्या पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरतात.

HappyBirthday:म्हणून, सुप्रिया सुळे बनल्या संसदरत्न

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

राजकीय वसा व परंपरा पाठीशी असली तरी कष्टाला पर्याय नसतो, आपल स्थान निर्माण करायच असेल तर जिद्द व चिकाटी जोडीला असावीच लागते, ही बाब खासदार सुप्रिया सुळे यांनी दाखवून दिली आहे. एक मोठी राजकीय परंपरा असलेल्या कुटुंबबातून येऊनही त्यांनी राजकारणातही कष्टाला पर्याय नसतात हेच सिध्द केले आहे.
 
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची एकुलती एक कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांचा प्रवास समाजकारणापासून सुरु झाला. समाजाच्या उपेक्षित घटकांसाठी काम करण्यास त्यांनी प्रारंभ केला. महिलांवर त्यांचा प्रारंभापासून भर राहिला. महिलांच्या व्यथा जाणून घेत त्या वर उपाययोजना व्हाव्यात या साठी सुरवातीपासून मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांशी त्या सतत संवाद साधत राहिल्या, पाठपुरावा करत राहिल्या.
 
एका वलयांकीत घराण्याच्या प्रतिनिधी असतानाही सामान्य जनतेशी नाळ कशी जोडून ठेवायची याचा वस्तुपाठच सुप्रिया सुळे यांनी घालून दिलेला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात त्या पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरतात. लोकसभा मतदारसंघ हा मोठा असतो. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला या सारख्या मतदारसंघातील प्रत्येक गाव व वाडीवस्ती पिंजून काढत तेथील लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न त्या पाच वर्षांच्या काळात करतात.

वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट
 
लोकसभेत नियमित व सर्वोत्तम उपस्थिती, प्रत्येक चर्चेत सक्रीय सहभाग, आपल्या मतदारसंघातील प्रश्न लोकसभेच्या व्यासपीठावर उपस्थित करुन त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या सातत्याने करतात. दिल्लीमध्ये सरकार असो वा नसो त्यांच्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळीसोबत उत्तम जनसंपर्क असल्याने सर्वच प्रश्न वेगाने मार्गी लागण्यासाठी त्याचा फायदा होतो. सुप्रिया सुळे यांचे वैशिष्टय म्हणजे त्या प्रत्येक मतदाराचे प्रश्न बारकाईने समजून घेतात, त्याच उत्तर कोणाकडे मिळणार आहे याचा अंदाज त्यांना असल्याने त्या स्तरावर ते प्रश्न नेत ते सोडविण्याचा प्रयत्न त्या सातत्याने करताना दिसतात. त्यांच्याकडे जाण्यासाठी कोणाच्या मध्यस्थीची किंवा वशील्याची अजिबात गरज भासत नाही हे महत्वाचे.
 
सोशल मिडीयावर सुप्रिया सुळे अँक्टीव्ह असतात, त्या मुळे तरुणाई सहजतेने त्यांच्याशी या व्यासपीठावर संवाद साधते. अगद्या छोट्या गोष्टींचीही त्या दखल घेतात आणि प्रश्न सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रश्न रेल्वेचा असो किंवा दूरसंचारचा, राष्ट्रीय महामार्गाचा असो किंवा परराष्ट्र मंत्रालयाचा....पाठपुरावा करावा तो सुळे यांनीच...

आणखी वाचा - पवार कुटुंबात सध्या कोण काय करतंय?
 
ट्विटर असो इन्स्टा असो वा फेसबुक असो...सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत कोणत्याही माध्यमातून समस्या पोहोचली की त्या तातडीने त्याची दखल घेत यंत्रणा कामाला लावतात. अडचण कितीही छोटी असली तरी त्या संबंधित यंत्रणेला हलवून संबंधित काम मार्गी लावतात. त्यांच्या या कार्यपध्दतीमुळे अनेक जण या माध्यमातून त्यांच्यापर्यंत समस्या पोहोचविण्याचा प्रयत्न करतात.
 
लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील जे नागरिक व विद्यार्थी परदेशात अडकून पडले होते, त्यांना भारतात परत आणण्याचा विषय जेव्हा पुढे आला तेव्हा पहिल्यांदा सर्वप्रथम नाव पुढे आले ते ज्येष्ठ नेते शरद पवार व सुप्रिया सुळे यांचेच.....राज्यातील ज्या नेत्यांचे दिल्लीत वजन आहे व ज्यांच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे, अशा खासदारात सुप्रिया सुळे यांचा समावेश होतो. राज्यातील असंख्य पालकांनी सुप्रिया सुळे यांना तातडीने फोन, मेसेज, ट्विटर या माध्यमातून साकडे घातले, त्या पैकी अनेकांना भारतात परत आणण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश आले अनेक प्रवासी व विद्यार्थी त्यांच्या प्रयत्नांनी भारतात परत आले.
 
गेल्या 13 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा व लोकसभेत काम केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 70 व्या आमसभेत अन्न सुरक्षेबाबत त्यांनी भारताची भूमिका जगापुढे विशद केली. सुप्रिया सुळे यांची कार्यपध्दती इतर राजकीय नेतृत्वांपेक्षा वेगळी आहे. एखाद्या शासकीय अधिका-यांची कामे करण्याची जशी नियोजनबध्द पध्दत असते त्या धर्तीवरच त्या काम करतात. त्यांची कार्यप्रणाली ही हटके असल्याने लोक त्यांच्या कार्यप्रणालीवर नेहमीच खूष असतात.
 
सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग....
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षात मोठे सामाजिक काम त्यांनी उभे केले. एका दिवसात सहा हजार श्रवणयंत्रे तर आठ तासात 4 हजार 846 श्रवणयंत्रे बसविण्याच्या ताईंच्या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली. राष्ट्रीय वयोश्री योजनेत देशात प्रथम क्रमांकाचे काम बारामती लोकसभा मतदारसंघात झाले. आजवर 20 हजारांहून अधिक नागरिकांना मोफत कृत्रीम अवयव व सहायभूत साधनांचे वाटप झाले आहे. आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासह अशा शेतक-यांच्या पत्नीला मोफत आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
 
अनेक पुरस्कारांनी सन्मान...
सन 2020 चा संसद महारत्न पुरस्काराने त्या सन्मानित असून सलग सहा वर्षे त्या संसदरत्न पुरस्काराने सन्मानित झाल्या आहेत. सलग तीन वर्ष त्यांना फेम इंडियाचा नारीशक्ती उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्राप्त झाला असून द सोफी इंडीयन अँवार्ड, देवी पुरस्कार, भारत अस्मिता पुरस्कार तसेच युनिसेफचा पार्लमेंट्री अवार्ड फॉर चिल्ड्रेन हा पुरस्कार त्यांना 2018 मध्ये प्राप्त झाला होता.

अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना दिला शब्द

महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न....
सुप्रिया सुळे यांनी गावरान खाद्य महोत्सव, ताईज किचन, कराटे प्रशिक्षण, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना हेल्थ कार्ड मिळावे या साठी पुढाकार, आशा वर्कर यांना मोफत सायकल वाटप, अंगणवाडी सेविकांना तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांमध्ये समावेश करुन घ्यावे हा मुद्दा संसदेत उपस्थित केला. ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागरुकता निर्माण करण्यासह महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले.
 
25 हजारांवर सायकलींचे वाटप....
घरापासून लांब अंतरावर शाळा असल्याने अनेक मुलींचे शिक्षण खुंटते. या संदर्भात केलेल्या एका अभ्यासात मुलींना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी साधन नसते, त्या मुळे त्यांचा शाळेतील प्रवास हळुहळू कमी होत जातो, ही बाब विचारात घेत काही सेवाभावी संस्थांच्या मदतीने बारामती लोकसभा मतदारसंघात आजवर 25 हजारांहून अधिक सायकली असलेली सायकल बँक उभारण्यात आली आहे. अनेक मुलींना शाळेत जायला सायकल मिळाल्याने शाळातील मुलींच्या गळतीचे प्रमाण लक्षणीय घटले आहे.
 
भविष्यातील संकल्पही तितकेच महत्वाचे...
सेल्फी विथ खड्डा या सारख्या अभिनव आंदोलनाने शासनाला जागे करणा-या सुप्रिया सुळे यांचे भविष्यातील व्हिजनही तितकेच महत्वाकांक्षी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ अँनिमियामुक्त, क्षयरोगमुक्त तसेच मलेरियामुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे. हा मतदारसंघ सर्वार्थाने देशातील सर्वात आदर्श असा मतदारसंघ ठरावा या साठी त्या जिवाचे रान करीत असतात.