'इथं शहर कोरोनाविरुद्ध लढतंय अन् तुम्ही शहर सुशोभिकरणाची कामं करताय' : खा. चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेचे बांधकाम विकसन शुल्क आणि जीएसटीचा केंद्राकडून येणारा वाटा, यामध्ये मोठी घट होण्याची चिन्हे आहेत.

पुणे : संपूर्ण शहर कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना महापालिकेचा पथ विभाग मात्र, सुशोभिकरणाच्या कामांसाठी लाखो रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करीत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी निधी कमी पडत असताना महापालिकेने ही कामे तातडीने थांबवावी, अशी मागणी खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे बुधवारी (ता.२९) केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे जगाची, देशाची, राज्यांची आणि पुण्यासारख्या शहरांची आर्थिक घडी विस्कटणार आहे. ही स्थिती पूर्ववत करणे हे आपल्यापुढे मोठे आव्हान असेल. देशात मुंबई खालोखाल कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. या संकटाचा सामना करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्री आणि वस्तूंसाठी, पुणे महापालिकेने खासगी कंपन्या संस्थांनी मदत करावी, असे आवाहन केले होते. सुदैवाने त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

- केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; १५ व्या वित्त आयोगाचा निम्मा निधी 'या'साठी ठेवला राखीव

शहरातील सध्याच्या परिस्थितीत महापालिकेचा निधी आरोग्यासह अतिमहत्वाच्या आणि तातडीच्या कामांवर खर्च करणे गरजेचे आहे. मात्र, महापालिकेच्या पदपथ विभागाने २० एप्रिल रोजी रस्ते व चौक सुशोभीकरणासाठी ३८ लाख रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. हे काम हे अंदाजपत्रकात असले तरी सध्याच्या परिस्थितीत या कामाची उपयुक्तता महापालिकेने तपासून पहावी.

- वरुणराजा बरसला; हवामान खातं म्हणतंय, 'राज्यात पुढील ३ दिवस...!'

यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेचे बांधकाम विकसन शुल्क आणि जीएसटीचा केंद्राकडून येणारा वाटा, यामध्ये मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर खर्चाच्या प्रस्तावांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. त्यामुळे सुशोभिकरणाची अनावश्यक कामे त्वरित थांबवावीत.

- Breaking : पुण्यातील आणखी एका तालुक्यात कोरोनाची एन्ट्री; पहिलाच रुग्ण अन् तोही पॉझिटिव्ह!

तसेच महापालिकेचा खर्चाचा प्राधान्यक्रम तातडीने निश्चित करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक निर्णय घ्यावेत. तसेच 38 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करावी, असे अॅड. चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Vandana Chavan has demanded that the PMC should stop the beautification work