Baramati : खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट; RTOची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati : खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट; RTOची कारवाई

Baramati : खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट; RTOची कारवाई

बारामती : एकीकडे एसटीचा संप सुरु असल्याने त्रस्त असलेल्या प्रवाशांना खाजगी वाहनचालकांच्या मनमानीला सामोरे जावे लागत होते. मात्र प्रवाशांच्या तक्रारीनंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिका-यांनी आज कारवाईचे अस्त्र उगारले.

हेही वाचा: "त्रिपुरातील घटनेवरुन महाराष्ट्रात कायदा हातात घेणं अयोग्य"

एसटीच्या संपाचा गैरफायदा घेत काही वाहनचालकांनी तिप्पट ते चौपट शुल्क आकारुन प्रवासी वाहतूक सुरु केली होती. बारामतीहून पुण्याला जाण्यासाठी चारशे तर दौंडकडे जाण्यासाठी दोनशे रुपये उकळले जात होते. प्रारंभी बघ्याची भूमिका घेतलेल्या आरटीओ विभागाने आता मात्र कारवाई सुरु केली आहे.

बारामती बसस्थानक व परिसरात आज सकाळपासूनच आरटीओ विभागाच्या अधिका-यांनी कारवाई केली. याबाबत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फैय्याज शेख, क्रांतीकारी आवाज संघटनेचे मच्छिंद्र टिंगरे आदींनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर खाजगी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा: '24 तासांत हजर व्हा, अन्यथा...'; 2296 एसटी कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम

प्रवाशांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने एसटीने खाजगी बस चालक तसेच चारचाकी वाहनांना प्रवासी वाहतूकीला परवानगी दिली. या बाबतचा दर फलकही लावला गेला. प्रत्यक्षात वाहनचालकाने त्यांना वाटेल तसे शुल्क आकारले. आज केलेल्या कारवाईमध्ये बारामती शहर पोलिसांनीही मदत केली.

कमी दरात वाहतूक शक्य नाही....

दरदिवसागणिक वाढणा-या इंधनाच्या किंमती, वाहनाचा देखभालीचा खर्च, चालकाचा पगार यांचा विचार केल्यास कमी दरात वाहतूक शक्य नाही. आम्हाला पुरेसे पैसे मिळणार नसतील तर वाहतूक कमी दरात करण्यापेक्षा ती बंद करु असे काही खाजगी वाहनचालकांनी या कारवाईनंतर स्पष्ट केले.

loading image
go to top