'ईद-ए-मिलाद'ला मिळाली सामाजिक बांधिलकीची जोड!

Eid_E_Milad
Eid_E_Milad

पुणे : हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) आणि नमाज अदा करण्याचा शुक्रवार एकाच दिवशी येण्याचा अनेक दिवसांनी आलेला दुग्धशर्करा योग साधला आणि मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी (ता.३०) दुपारी नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नवनवीन कपडे परिधान करून खीर-पुरी, पुलाव, बिर्याणी अशा लज्जतदार पदार्थांवर यथेच्छ ताव मारण्याबरोबरच समाजातील रंजल्या-गांजलेल्यांना मिठाई, शिरखुर्मा, दिवाळी फराळ देत पैगंबर साहेबांच्या जयंतीला सामाजिक बांधिलकीची जोड दिली.

यंदाच्या पैगंबर जयंतीवर कोरोनाचे सावट असल्याने सीरत कमिटीने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार सामूहिक नमाज पठण झाले नाही. मात्र मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरी राहूनच पैगंबर जयंती साजरी करण्यास प्राधान्य दिले. अनेक वर्षातून यंदा पहिल्यांदाच पैगंबर जयंती आणि शुक्रवारचा दिवस एकत्र आला. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील मुस्लिम नागरिकांच्या घरी शिरखुर्मा, खीरपुरी, मिठाई अशा गोडधोड पदार्थांबरोबरच चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, पुलाव, दालचा खाना, वेगवेगळ्या प्रकारची मिठाई असा खास बेतही सुरू होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नागरीकांनी आपापल्या घरातच कुटुंबासमवेत नमाज अदा केली. त्यानंतर सर्व कुटुंबांनी एकत्रितपणे जेवण करून सणाचा आनंद द्विगुणित केला. बहुतांश नागरिकांना आपले नातेवाईक, मित्र-मंडळी, शेजारी यांना गोडधोड पदार्थ पाठवून आपल्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घेतले. कोरोनामुळे बहुतांश नागरिकांनी एकमेकांच्या घरी जाणे किंवा बाहेर जाण्याचे टाळले.

'जश्‍न-ए-ईद मिलादुन्नबी!' 
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीलाच ईद-ए-मिलाद असेही म्हटले जाते. त्याचबरोबर या सणाचा 'जश्‍न-ए-ईदमिलादुन्नबी' असा आवडीने उल्लेख केला जातो. त्यातील 'नबी' म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर आणि 'मिलाद' म्हणजे पैगंबर साहेबांच्या आगमनाचा आनंदोत्सव. पैगंबर यांच्या जयंतीचा हा दिवस मुस्लिम बांधवांमध्ये मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जातो. 

सामाजिक बांधिलकीची जोड 
पुणे शहर सीरत कमिटीच्यावतीने पैगंबर जयंतीनिमित्त बंडगार्डन रस्त्यावरील मुलींच्या अनाथाश्रमामध्ये तांबोळी जमातचे अध्यक्ष हाजी नजीरभाई तांबोळी धायरीवाले यांच्या हस्ते 200 मुलींना मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी कमिटीचे सरचिटणीस रफीउद्दीन शेख, सिराज बागवान, आसिफ शेख, ऍड.शाहीद शेख, मुश्‍ताक अहमद, मुनव्वर खान रामपुरी, अय्याज सय्यद आदी उपस्थित होते. मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट व अखिल राष्ट्रीय समाजसेवा प्रतिष्ठानतर्फे ताराचंद रुग्णालयात मुश्‍ताक पटेल व हाजी इक्‍बाल तांबोळी यांच्या हस्ते अतिदक्षता कक्षातील कोविड योद्धा सेवकांना मिठाई व दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. यावेळी मौलाना ओवीस, अब्दुल कपूर मोमीन, भरती पणखेवले, मोहसीन सय्यद आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे (आझम कॅम्पस) 16 वर्षांपासून काढण्यात येणारी अभिवादन मिरवणूक यंदा रद्द करण्यात आली. तसेच आझम कॅम्पसमधील सभागृहातच 50 जणांच्या उपस्थितीत साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, सचिव लतीफ मगदूम, शिक्षक, प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com